चंद्रपूर भाजपमध्ये घराणेशाही, एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी

काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने चंद्रपूर जिल्ह्यात तोच कित्ता गिरवला आहे. होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत एकाच नेत्याच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांचे पुत्र, भाऊ आणि बहीण अशा तिघांना बल्लारपूर नगरपालिकेत उमेदवारी देण्यात आली आहे.

भाऊ लखनसिंहा चंदेल, मुलगा विश्वजितसिंह चंदेल आणि बहीण किरण चंदेल यांना तीन वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. चंदनसिंह चंदेल हे सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत निकटचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. बल्लारपूर हा मुनगंटीवार यांचाच मतदारसंघ. त्यामुळे तेथील नगरपालिकेची सर्व जबाबदारी मुनगंटीवार यांचीच. याचा लाभ आपल्या खास सहकाऱ्याला देण्यासाठी एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली असावी, अशी चर्चा रंगली आहे. ही घराणेशाही तालुका पातळीवरची असली तरी घराणेशाहीच आहे. त्यामुळे इतरांना नावे ठेवणारा भाजप किती शुचिर्भूत आहे, हे दिसून आले, अशी टीका आता विरोधक करीत आहेत.