ठाण्यात भाजपला गळती, शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत!

गद्दार मिंधे आणि कपटकारस्थानी भाजपच्या राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते आता शिवसेनेत स्वाभिमानाने दाखल होत आहेत. ‘मातोश्री’ येथे आज डोंबिवलीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी बोरिवलीतील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेंद्र भोईर व त्यांची पत्नी ट्विंकल भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपनेते संपर्पप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर विभाग क्र. 1 मधील शिंदे गटाचे दहिसर विधानसभेतील वॉर्ड क्र. 7 चे संदीप राऊत व बोरिवली विधानसभेतील वॉर्ड क्र. 18 मधील रूपेश नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते–सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, दहिसर विधानसभा संघटक तेजस्वी घोसाळकर यांच्यासह शिवसैनिक-पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जिद्दीने लढणार आणि जिंकणार!

‘मातोश्री’वर झालेल्या पक्षप्रवेश सोहळय़ात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, ‘अंगात हिंमत असेल तर विजय दूर नसतो. त्यामुळे आपण जिद्दीने लढणार आणि जिंकणार. पण मुंबई असो वा ठाणे तुम्ही जागते रहा!’ शिवरायांचा आणि शिवसेनेचा भगवा डौलाने फडकल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.