
टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे स्मृती मानधना हिचा आज होणारा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, असा निर्णय कुटुंबीयांनी जाहीर केला. मात्र, या विवाहसोहळ्यानिमित्त क्रीडा क्षेत्रांतील अनेक मान्यवर सांगलीत दाखल झाले होते. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे या मार्गावरची सर्व वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
सांगली शहरानजीकच्या एका खासगी लॉनमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि तिचा नियोजित वर प्रसिद्ध संगीतकार पलाश मुछाल यांचा आज विवाहसोहळा पार पडणार होता. शनिवारी रात्री हळद आणि संगीत कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रमांना क्रीडा क्षेत्रांतील तसेच इतर मान्यवरांसह अनेकांनी हजेरी लावली. नुकत्याच विश्वविजयी ठरलेल्या क्रिकेट संघातील अनेक महिला खेळाडूंची उपस्थिती होती. यासाठी सांगली शहरातील अनेक नामांकित हॉटेल्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या हॉटेलसमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, विवाहसोहळा लिमिटेड म्हणजेच
शंभर-दीडशे लोकांच्या उपस्थितीत साजरा होत असल्याने या सोहळ्याला सांगलीतील अनेक मान्यवरांनाही निमंत्रण नव्हते. सांगलीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा हा शाहीविवाह शहरातील एका खासगी लॉनमध्ये निमंत्रितांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. मात्र, आज सकाळीच स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्मृती मानधना यांचे वडिलांवर अपार प्रेम असल्याने आजचा आपला विवाहसोहळा रद्द करावा. वडिलांची प्रकृती ठीक झाल्यानंतरच हा विवाहसोहळा करावा, असा आग्रह तिने धरला. त्यामुळे आजचा विवाहसोहळा रद्द करण्यात आला, असे तिच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले.
नामांकितांना पाहण्यासाठी सांगलीकरांची गर्दी
स्मृती मानधना हिच्या विवासोहळय़ासाठी आलेल्या नामांकितांना पाहण्यासाठी सांगलीकरांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती. यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक यंत्रणाच बंद करण्यात आली. अनेक नामांकितांना पोलिसांनी त्यांच्या हॉटेलमधील निवासस्थानी सुरक्षितपणे पोहोचवले.




























































