
कचरा संकलन करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरात घंटागाडी हा उपक्रम सुरू केला असला तरी अनेक नागरिक रस्त्यावर कचरा फेकत आहेत. या कचऱ्याच्या उकिरड्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याला ब्रेक लावण्यासाठी पालिका प्रशासनाने कचरा पडणाऱ्या ठिकाणांचे सुशोभिकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वाढत्या अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शहर अधिक सुंदर करण्याच्या उद्देशाने आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून वारंवार कचरा पडणारी ठिकाणे कायमस्वरूपी
स्वच्छ करून सुशोभित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील काही भागांमध्ये नागरिकांनी उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होत होता. त्याचबरोबर शहराचे सौंदर्यही बाधित होत होते. हीच समस्या ओळखून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अशा ठिकाणांचे मूळ कारण शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. या तपासात रात्रीच्या वेळी काही मोकळ्या जागांवर कचरा फेकला जात असल्याचे निदर्शनास आले. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेकडून आता रात्रीच्या सत्रातदेखील घंटागाडी पाठवली जात आहे. नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकता तो केवळ घंटागाडीमध्येच देण्याचे आवाहन उपायुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे.
सर्व कचराकुंड्या हटवल्या
मे 2020 पूर्वी शहरात तब्बल 3 हजार 700 कचराकुंड्या अस्तित्वात होत्या. मात्र कचराकुंडीत वाढत जाणारी अस्वच्छता आणि दुर्गंधी पाहता या सर्व कचराकुंड्या हटवून घंटागाडीमार्फत कचरा संकलन प्रणाली सुरू करण्यात आली. या व्यवस्थेमुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत झाली असून आता चालू सुशोभिकरण मोहिमेमुळे या ठिकाणी नवीन हरित कोपरे उभे राहत आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याकरणात मोलाची भर पडणार आहे.
























































