
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात आणि उत्साहात पार पडला. तेव्हापासून रामनगरी अयोध्येत मोठय़ा संख्येने भाविक पोहोचत आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मंदिर बनले आहे. गेल्या वर्षभरात 13 कोटींहून अधिक लोक अयोध्येत पोहोचले आहेत. दानधर्मात आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी या मंदिरात 1500 ते 1650 कोटी रुपयांच्या दान, देणग्या दिल्या जातात. दुसऱया क्रमांकावर केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर आहे. या मंदिरात वार्षिक 750 ते 800 कोटींचे दान भाविकांकडून दिले जाते. यानंतर आता राममंदिर तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून एका वर्षात 700 कोटी रुपयांचे दान मिळाल्याचे समजते. या एका वर्षात अयोध्येने अनेक विक्रम प्रस्थापित केले. दानधर्मात राममंदिराने वैष्णोदेवी आणि शिर्डीच्या साई मंदिराला मागे टाकले आहे. राममंदिर ही भाविकांची पहिली पसंती बनत आहे.
या मंदिरांनाही मिळते कोट्यवधींचे दान
चौथ्या क्रमांकावर पंजाब अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर आहे. येथे वार्षिक 650 कोटी रुपयांचे दान दिले जाते. पाचव्या क्रमांकावर जम्मू आणि कश्मीरचे वैष्णोदेवी मंदिर आहे. दरवर्षी 600 कोटी रुपयांचे दान या मंदिरात दिले जाते. सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात 500 कोटी रुपयांचे दान दिले जाते. सातव्या क्रमांकावर ओडिशामध्ये असलेले पुरी येथील जगन्नाथ मंदिर असून येथे 400 कोटी रुपयांचे दान दिले जाते. आठव्या क्रमांकावर नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आहे. येथे दरवर्षी 200 ते 250 कोटी रुपयांचा निधी येतो.























































