
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रारुप मतदार याद्यांबाबत हरकती नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर मतदार यादीही 12 डिसेंबरऐवजी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने त्या कार्यक्रमात सुधारणा केली आहे. दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 5 डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. ती तारीखही 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 15 डिसेंबरला मतदान पेंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर 22 डिसेंबरला मतदान पेंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारुप मतदारयाद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ असल्याचे विरोधी पक्षांकडून वारंवार पुराव्यानिशी समोर आणले जात आहे. मतदार याद्यांमध्ये लाखोंच्या संख्येने दुबार मतदार आहेत. लाखो मतदारांची नावे अनेक वॉर्डांच्या मतदार याद्यांमध्ये आहेत. दुकानांमध्येही 40-50 मतदार राहत असल्याचे दाखवले गेले आहे. एपिक नंबर आणि घर नंबर नसलेलेही हजारो मतदार आहेत. असे अनेक मुद्दे विरोधी पक्षांनी उघडकीस आणतानाच हरकती नोंदवण्यास किमान 21 दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली होती.































































