
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अहिल्यानगर जिह्यात श्रीरामपूर येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले. पिस्तुलाचा धाक दाखवत विवस्त्र्ा करून गुजर यांना बेदम मारहाण केली आणि निर्जनस्थळी सोडून दिले. या घटनेने खळबळ उडाली असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या घटनेने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पुन्हा पडला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रशेखर ऊर्फ चंदू आगे याच्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुह्यात वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत.
सचिन गुजर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नेहमीप्रमाणे सचिन गुजर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. सकाळी 7 च्या सुमारास घरापासून काही अंतरावर गेले असता, एक कार आली. त्यातील चंदू आगे आणि त्याचा एक साथीदार खाली उतरले. दोघांनी पकडले आणि ‘तू आमच्या साहेबांविरुद्ध जास्त बोलतो, तुला जास्त माज आला आहे,’ असे म्हणत जबरदस्तीने सचिन गुजर यांना कारमध्ये मागील सीटवर बसवले. कारमध्ये त्यांचा आणखी एक साथीदार होता. त्याने कानाला पिस्तूल लावले. कारमागे दोन दुचाकीवरून चंदू आगेचे आणखी साथीदार आले. सहाजणांनी बेदम मारहाण केली. मोबाईलही पह्डण्यात आला. निर्जनस्थळी नेऊन विवस्त्र्ा केले आणि सोडून दिल़े काही हिंदुत्ववादी संघटनांचा यात हात असावा, असे गुजर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, आमदार हेमंत ओगले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हेगारांना तत्काळ अटक करा, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
मुख्यमंत्र्यांना नेमका कसा महाराष्ट्र पाहिजे? – थोरात
सचिन गुजर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्रात बिनविरोध जागा आल्या यामागे कोण आहे? कोणाची दहशत आहे? हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना नेमका कसा महाराष्ट्र पाहिजे? असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

































































