ज्येष्ठ नागरिक, महिलांनो.. बगीच्यांमध्ये बिनधास्त फिरा ! कल्याण, डोंबिवलीतील उद्यानांवर 179 सीसीटीव्हींचा वॉच, गर्दुल्ले, मद्यपींच्या गैरकृत्यांना आळा

कल्याण, डोंबिवलीमधील उद्यानांवर १७९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांनो.. आता बगीच्यांमध्ये बिनधास्त, मनमोकळेपणे फिरा. त्यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांचा खर्च केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच डेकोरेटिव्ह लाईटिंगही बसवली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्व उद्याने लखलखून गेली आहेत. महापालिकेच्या या बंदोबस्तामुळे गर्दुल्ले व मद्यपींच्या गैरकृत्यांना आळा बसणार आहे.

कल्याण, डोंबिवलीमध्ये असलेल्या उद्यानांची अवस्था अतिशय दयनीय होती. महिला व ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात तेव्हा त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर येतो. अनेकदा पाकिटमारी, चेन स्नॅचिंगच्या घटना घडतात. तसेच गर्दुल्ले व मद्यपींचा वावर दिसून येतो. त्यामुळे बगीच्यात येणारे नागरिक भयभीत झाले होते. याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या.

प्रशासनाची करडी नजर
बगीच्यांमध्ये नागरिकांना मुक्तपणे व सुरक्षित फिरता यावे यासाठी पालिकेने कल्याण व डोंबिवलीतील उद्यानांवर १७९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. ही कामे विद्युत विभागाने त्वरित पूर्ण केली. सीसी कॅमेऱ्यांमुळे सर्व उद्यानांमधील घडामोडींवर करडी नजर राखणे प्रशासनाला शक्य झाले आहे.

या ठिकाणी बसवले कॅमेरे
शेनाळे तलाव, नाना धर्माधिकारी उद्यान, रमाबाई आंबेडकर उद्यान, रुक्मिणीबाई दवाखाना परिसर (कल्याण), मीनाताई ठाकरे उद्यान, सावित्रीबाई फुले रंगमंदिर, क्रीडासंकुल, तरण तलाव, आनंदनगर उद्यान, भागशाळा मैदान (डोंबिवली).

येथे लावले डेकोरेटिव्ह पोल
कारभारी उद्यान, धर्मवीर आनंद दिघे उद्यान, नाना धर्माधिकारी उद्यान, चौधरी मोहल्ला उद्यान (कल्याण), सावरकर उद्यान (डोंबिवली).