Cyclone Senyar – चक्रीवादळाचा वेग वाढला; दक्षिणेकडील राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने (IMD) चक्रीवादळ सेन्यारबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आता या चक्रीवादळाचा वेग वाढल्याने त्याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सेन्यार चक्रीवादळ इंडोनेशियाच्या किनारा ओलांडल्यानंतर आग्नेय दिशेने सरकत आहे. पुढील दोन दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, माहे आणि रायलसीमा येथे वादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सेन्यार आता इंडोनेशियातून आग्नेय दिशेने सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे, पुढील दोन दिवसांत अंदमान आणि निकोबार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, माहे आणि रायलसीमा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळाची तीव्रता वाढत असल्याने हवामान खात्याने या राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. सध्या मलाक्का सामुद्रधुनी आणि ईशान्य इंडोनेशियावर असलेले चक्रीवादळ सेन्यार प्रथम अंदमान आणि निकोबार बेटांवर परिणाम करेल. तेथे 27 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

२९-३० नोव्हेंबरच्या सुमारास सेन्यार चक्रीवादळ तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मलाक्का सामुद्रधुनी, मलेशिया, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, इंडोनेशिया आणि थायलंडवरही जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आणि जोरदार वारे आणि लाटांपासून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान विभागाने असेही म्हटले आहे की २७ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी बंगालच्या उपसागरातील वाऱ्याची परिस्थिती आणि कमी दाबाचे निरीक्षण केल्यानंतरच हे चक्रीवादळ उत्तरेकडे आणि वायव्येकडे म्हणजेच बंगाल आणि ओडिशाकडे सरकेल की नाही हे स्पष्ट होईल. दक्षिण किनारी तामिळनाडूमध्ये २८ नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होऊ शकतो. तसेच २९ आणि ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. या वर्षी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये थैमान घातले होते.