
जग वेगाने बदलत आहे आणि हा बदल तंत्रज्ञान, जीवनशैली आणि ट्रेंडमध्ये दिसून येत आहे. त्याचसोबत त्याचा परिणाम राहणीमानाच्या सवयींमध्ये दिसून येतो. त्यातच आता संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात वाढत्या शहरीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. जगातील 80% पेक्षा जास्त लोक आता शहरात राहतात. याचा अर्थ असा की, एकेकाळी मानवी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेली गावे आणि ग्रामीण भाग आता ओस पडत आहेत. पहिल्यांदाच इतका महत्त्वाचा बदल दिसून आला आहे आणि म्हणूनच या अहवालातून जागतिक लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन अहवालानुसार, जगात आता पूर्वीपेक्षा जास्त शहरीकरण होत आहे. 80% पेक्षा जास्त लोक शहरांकडे वळत आहे, त्यामुळे गावांमधील लोकसंख्या कमी होत आहे. येत्या काही दशकांत हा बदल वेगाने वाढणार आहे. हा ट्रेंड केवळ राहण्याच्या जागांमध्ये बदल करत नाही तर समाज, अर्थव्यवस्था आणि लोकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.
युनायटेड स्टेट्सच्या “जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट्स २०२५” अहवालात असे दिसून आले आहे की जगातील जवळजवळ चार-पंचमांश म्हणजे 80 टक्के लोकं आता शहरांमध्ये राहत आहे. २०१८ मध्ये, हा आकडा फक्त ५५% होता, म्हणजेच सात वर्षांत शहरी लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अहवालानुसार, ४५% लोक शहरांमध्ये आणि ३६% लोक निमशहरी भागामध्ये राहतात. हा अहवाल पॅट्रिक गेरलँड यांच्या नेतृत्वाखाली अनेक संशोधकांच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता.
अहवालात असा अंदाज आहे की २०५० पर्यंत जगातील ८३% लोकसंख्या शहरात राहील. याचा अर्थ असा की येत्या काळात शहरे वाढतील, नवीन शहरे बांधली जातील आणि गावे अधिक रिकामी होतील. अहवालानुसार, पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये, विशेषतः हिंदुस्थानसारख्या देशांमध्ये, लोक गावे सोडून शहरांमध्ये जात आहेत, प्रामुख्याने चांगले शिक्षण, नोकऱ्या किंवा चांगले सामाजिक जीवन जगण्यासाठी हे बदल होत आहेत.
शहरीकरणाचा परिणाम केवळ लोकसंख्येवरच नाही तर लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. किंग्ज कॉलेज लंडनमधील तज्ज्ञ अँड्रिया मेशेली यांच्या मते, शहरांमध्ये वायू प्रदूषण आणि वाढती उष्णता लोकांना आजारी बनवत आहे. यामुळे हृदयरोग आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका वाढतो. शिवाय, अनेक शहरी भागात उद्याने आणि हिरव्यागार जागांचा अभाव आहे. ही कमतरता चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांमध्ये वाढ होण्याशी जोडली गेली आहे. या अहवालातून स्पष्टपणे दिसून येते की आपले जग वेगाने शहरी जग बनत आहे, ज्यासाठी आपल्याला आतापासून चांगल्या योजना कराव्या लागतील जेणेकरून आपण त्याचे फायदे तसेच आव्हानांना तोंड देऊ शकू, असे अहवालात म्हटले आहे.

























































