
रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक १४ मध्ये महाविकास आघाडीने प्रचारात मुसंडी मारली आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रशिदा गोदड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीलेश भोसले या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत.
रशिदा गोदड गेली अनेक वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या आहेत. त्यामुळे या निष्ठावंत रशिदा गोदड यांना नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीलेश भोसले निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी या प्रभागातील नगरसेवक गद्दारी करून शिंदे गटात गेल्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला नीलेश भोसले यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे नीलेश भोसले यांचे पारडे जड आहे. प्रभाग क्र.१४ हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग आहे. महाविकास आघाडीने या प्रभागात प्रचाराचा पहिला टप्पा पार केला आहे. शिवसेनेच्या पदयात्रेलाही या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनीही प्रचारात सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला.



























































