जगळपूर येथे शेतात सापडले अतिविषारी घोणस, सर्पमित्राने दिले जीवनदान

जळकोट तालुक्यातील जगळपूर येथील शेतकरी व्यंकटेश पाटोदाकर यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या बनमी मध्ये दोन साप दिसून आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत काम करीत असलेले सर्पमित्र अमोल शिरूरकर, दयानंद हाक्के यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र शिरूरकर लगेचच त्यांची टीम घेऊन त्याठिकाणी पोहोचले व त्यांनी त्या अतिविषारी दोन्ही घोणस सापांना कसलीही इजा न होऊ देता सुखरूप पकडले.

घोणस साप नर व मादी होते. नर या सापाची लांबी तीन फूट होती तर मादी साडे तीन फुटाची होती. या दोन्ही सापास वनविभागाच्या जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले. शेतीत काम करत असताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे घोणस या सापाचा मिलनाचा काळ असतो. त्यामुळे हे साप शेतीत व आपल्या अवती भवती जास्त प्रमाणात आढळून येतात. शेतकऱ्यांनी शेतीत काम करत असताना रात्री हातात बॅटरी, हातात हातमोजे, पायात घन बूट वापरावेत असे आवाहन सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी केले आहे.