
‘सत्तेतून पैसा, त्याच पैशांतून पुन्हा सत्ता व पैसा’ या चक्रात महाराष्ट्राचे राजकारण गुंतले आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात, ‘‘माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. पैशांची चिंता करू नका. तुम्ही निवडणुका जिंका.’’ गुलाबराव पाटील, बावनकुळे हे दोन वेगळ्या पक्षांचे मंत्री ‘लक्ष्मी’दर्शनाच्या बाबतीत एकाच सुरात बोलतात. बावनकुळ्यांकडे महसूल खाते, एकनाथ शिंद्यांकडे नगरविकास खाते, अजित पवारांकडे अर्थ खाते. ही सर्व खाती म्हणजे ‘मालच माल.’ हाच माल नगरपालिका निवडणुकीत टाकून निवडणुका जिंकायच्या हेच सत्ताधाऱ्यांचे धोरण व तोरण दिसते.
महाराष्ट्रात मिंधे गटाचा खरा चेहरा रोज उघड होत आहे. कोकणात भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नगरपालिका निवडणुकीसाठी पैशांचे वाटप करीत आहेत. कोकणातील निवडणूक चव्हाणांनी कठीण करून सोडल्याचा आवाज आमदार नीलेश राणे यांनी दिला. भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकून आमदार नीलेश राणे यांनी लाखो रुपयांचा पैसा पकडला याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. निवडणूक आयोगाच्या पथकाने जे करायला हवे ते नीलेश राणे यांनी केले. नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांत सत्ताधारी पक्ष ‘पैसा पैसा’ असा पाऊस पाडत आहे व त्यात सर्वात पुढे भाजप आणि मिंधे गट आहेत. मिंधे गटाचे आमदार नीलेश राणे हे भाजपच्या थैलीशाहीविरुद्ध आवाज उठवत असताना त्यांच्याच पक्षाचे एक बेताल मंत्री गुलाबो पाटील यांनी ‘‘आमच्याकडे भरपूर माल आहे. मालच माल आहे. कारण नगरविकास खाते आमच्याकडे आहे. 2 तारखेला निवडणुका आहेत. 1 तारखेला रात्री घराबाहेर झोपा. लक्ष्मी येईल,’’ असे उघड उघड सांगितले. मतदानाच्या आदल्या दिवशी लक्ष्मी फिरणार असल्याचे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही दशा आहे. निवडणुकांत मतदारांना पैसे वाटतो व मते विकत घेतो, असे निर्लज्जपणे सांगणारा मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बसला आहे. फडणवीस, निवडणूक आयोग त्यावर गप्प आहेत. नगरपालिका निवडणुकांत पैशांचा वारेमाप वापर सुरू आहे. पुन्हा खुद्द मंत्रीच जेव्हा हे सांगतात तेव्हा अशा मंत्र्याला लगेच मंत्रिमंडळातून बडतर्फ केले पाहिजे. भ्रष्टाचार सहन करणार नाही, भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असे देशाचे पंतप्रधान रोज सांगतात व
सत्याची धर्मध्वजा
फडकवतात. प्रत्यक्षात त्यांचे सरकार भ्रष्ट पैशांवर तरले आहे. मिंधे गट हा भ्रष्ट पैशांतून निर्माण झालेला बुडबुडा आहे. त्या पक्षात सगळे सोंगी व ढोंगी आहेत. नीलेश राणे हे आमदार कोकणात भाजप पैशांचे वाटप करतोय म्हणून त्या भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष करतात. त्याच वेळी त्यांच्या पक्षाचा एक मंत्री मतदारांना पैसे वाटपाविषयी खुले आवाहन करतो की, ‘‘पैसे घ्या व मते द्या. नगरविकास खाते व त्यातला माल निवडणुकांत मते विकत घेण्यासाठीच आहे.’’ आमदार नीलेश राणे यांनी यावरही बोलायला हवे. गुलाबराव पाटील नगरविकास खात्याच्या ‘माला’विषयी बोलतात, कारण नगरविकास खाते हे भ्रष्टाचाराचे आगर बनले आहे. सर्व महानगरपालिकांची लूट मागच्या चार वर्षांत कशी झाली ते जनतेने पाहिले आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत कोट्यवधींची कामे फक्त कागदावर दिसतात. प्रत्यक्षात ही कामे झालीच नाहीत. मुंबईत दोन लाख कोटींची कामे महापालिकेच्या माध्यमातून काढली. ती प्रत्यक्ष जमिनीवर दिसलीच नाहीत. हे दोन लाख कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीत आले आहेत. गुलाबराव पाटलांनी तेच जाहीर केले. प्रत्येक नगरपालिकेत मिंधे, अजित पवार, भाजप साधारण दहा कोटी रुपये खर्च करीत असल्याची माहिती धक्कादायक आहे. सत्तेतल्या तिन्ही पक्षांचे बजेट हजार ते बाराशे कोटी असावे. हा पैसा कोणत्या मार्गाने येतो? फडणवीस नागपूरच्या शेतीतून हा पैसा आणत नाहीत, मिंधे सातारच्या शेतीतून हा पैसा मिळवत नाहीत आणि अजित पवार बारामतीमधील द्राक्ष व उसातून हा पैसा पिकवत नाहीत. म्हणजेच
हा पैसा लुटीतून
आणि भ्रष्टाचारातून मिळवला आहे. ‘सत्तेतून पैसा, त्याच पैशांतून पुन्हा सत्ता व पैसा’ या चक्रात महाराष्ट्राचे राजकारण गुंतले आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात, ‘‘माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. पैशांची चिंता करू नका. तुम्ही निवडणुका जिंका.’’ गुलाबराव पाटील, बावनकुळे हे दोन वेगळ्या पक्षांचे मंत्री ‘लक्ष्मी’दर्शनाच्या बाबतीत एकाच सुरात बोलतात. बावनकुळ्यांकडे महसूल खाते, एकनाथ शिंद्यांकडे नगरविकास खाते, अजित पवारांकडे अर्थ खाते. ही सर्व खाती म्हणजे ‘मालच माल.’ हाच माल नगरपालिका निवडणुकीत टाकून निवडणुका जिंकायच्या हेच सत्ताधाऱ्यांचे धोरण व तोरण दिसते. गुलाबराव पाटील यांच्यासारख्या बेताल, भ्रष्ट मंत्र्यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? नगरविकास खात्यात भ्रष्टाचाराचा माल आहे, हे गुलाबराव पाटील सांगतात. महाराष्ट्राचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते यावर काय कारवाई करणार आहे? मतदाराला विकत घेण्याची भाषा त्यांनी केलीच, पण महाराष्ट्राचा मतदार विकाऊ आणि भ्रष्ट मानसिकतेचा आहे अशी अपमानास्पद भाषा त्यांनी वापरली. पैशांनी विजय मिळवता येतो. मतदार, निवडणूक यंत्रणा पैशांनी विकत घेता येते व आम्ही ती विकत घेतल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटीलसारखे मंत्री करतात आणि निवडणूक आयोग मुर्दाडासारखा ते वक्तव्य फक्त ऐकून शांत बसतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्ट व मूर्खांचा गराडा पडला आहे. अर्थात, हा फडणवीसांचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्र मात्र त्यामुळे रोज बदनाम होत आहे त्याचे काय?






























































