विज्ञान रंजन – नेमेचि येती…

>> विनायक

बुद्धिमान असलेला माणूस नावाचा प्राणी अनेकदा ‘बेभरवशाचं’ वर्तन करतो. म्हणजे ‘उद्या नक्की भेटूया’ असं सांगणारे आयत्या वेळी काही खरं-खोटं कारण सांगून गुंगारा देऊ शकतात. ‘वेळापत्रका’ची निर्मिती माणसं करतात, पण ते पाळण्याचं दायित्व पाळतातच असं नाही. कमी बुद्धीचे प्राणी-पक्षी मात्र, त्यांच्या नैसर्गिक उर्मीशी प्रामाणिक राहून आपल्या जीवनचक्राचं वेळापत्रक कोणतीही ‘लिखापढी’ न करतासुद्धा योग्य पद्धतीने पाळत असतात. म्हणूनच पूर्वी निसर्गचक्रानुसार येणाऱ्या पावसालासुद्धा ‘नेमोचि येतो, मग पावसाळा’ असं प्रशस्तिपत्र मिळालं होतं. मात्र, गेल्या दोन दशकांत त्यानेही ‘नियमबद्ध’ असण्याचा लौकिक गमावलाय. अर्थात तीसुद्धा माणसाचीच करामत. वाढतं जागतिक तापमान आणि वाढतं प्रदूषण वगैरेचा परिणाम होऊन पाऊसही माणसासारखाच बेभरवशाचा झाल्याचं जाणवतंय.

दरवर्षी, ऊबदार उन्हाळय़ाच्या शोधात अन्न संशोधन आणि प्रजनन करण्यासाठी स्थलांतर करणाऱया, आकाशगामी पक्षीगणांवर त्याचा अजिबात परिणाम झालेला नसेल, असं कसं म्हणणार? तरीसुद्धा थोडय़ाशाच वेळ-बदलाने ही पृथ्वीभर भ्रमंती करणारी पक्षीमंडळी आता आपल्या देशात काही काळ वस्तीला येतील. अगदी ‘नेमेचि’ येणारे हे पक्षी अनेक पक्षीनिरीक्षकांच्या अभ्यासाचा विषय असतो. अनेक पक्षी-ओळख कार्यक्रमात भाग घेताना या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाचा आनंद वर्षानुवर्षे घेता आला. निसर्गातल्या या रंगबेरंगी उडत्या आणि बहुतांश निरुपद्रवी असलेल्या पक्ष्यांचं दर्शन मोहक आणि विस्मयकारकही असतं.

एखादा आठ-दहा ग्रॅम वजनाचा ‘व्रॉब्लर’सारखा पक्षी पाच-सात हजार किलोमीटरचा हवाई-प्रवास आपल्या चिमुकल्या आणि नाजुक पंखांच्या बळावर कसा काय करू शकतो हा नेहमीच मनाशी येणारा कुतूहलाचा विषय. या पक्षी-प्रवासाची परंपरा हजारो वर्षांची आहे. त्याचा रीतसर अभ्यास मात्र गेल्या दोन शतकांतला. आपल्याकडे पक्षीनिरीक्षक ऋषीतुल्य डॉ. सलीम अली किंवा काही महिन्यांपूर्वी दिवंगत झालेले अरण्यतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनपद्धतीवर भरपूर लिखाण केलं आहे. हिंदुस्थानात आढळणाऱया आणि नियमितपणे वार्षिक पाहुणे असणाऱ्या पक्ष्यांविषयी डॉ. सलीम अली यांनी त्यांच्या ‘इंडियन बर्डस्’सारख्या पुस्तकांमधून सविस्तर आणि सचित्र माहिती दिली आहे.

आता थंडीची चाहुल लागलीय. एखादी द्विनेत्री (बायनॉक्युलर्स) घेऊन पहाटेच्या वेळी धुक्यातून वाट काढत स्थलांतरित पक्ष्यांचा, त्यांना त्रास होणार नाही अशी शांतता बाळगत मागोवा घेण्यात खूप मजा असते. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांपासून असं वार्षिक पक्षी निरीक्षण करताना मिळालेला आनंद अक्षरशः ‘गगनात’ न मावणारा आहे. आपल्या समशीतोष्ण हवामानाच्या देशातील ‘फ्लोरा-फॉना’ किंवा जैववैविध्य अगाध आहे. ‘वेळ नाही’ असं कारण पुढे करत या निसर्गाच्या शतरूपांचं दर्शन घेणं टाळणं योग्य नव्हे. आपल्या पृथ्वीवरच्या सहजीवांविषयी बालपणीच कुतूहल आणि तरुण वयात अभ्यास घडला पाहिजे. हा ‘अभ्यास’ परीक्षा देण्याचा नव्हे तर रोजच्या कातावलेल्या आयुष्यातील उल्हास वाढवणारा विरंगुळा ठरायला हवा.

आपल्या देशात उत्तर ध्रुवावरून थंडीच्या दिवसात अनेक पक्षी येतात. सूर्याचं दक्षिणायन सुरू झालं की आपल्याला गारठा जाणवू लागतो. पक्ष्यांसाठी मात्र तो ‘ऊबदार’ उन्हाळाच असतो. कारण ध्रुवीय प्रदेशातल्या बर्फाळ वातावरणापेक्षा आपल्याकडचा हिवाळा त्यांना सुखकारक वाटतो. त्यामुळे सुमारे 400 प्रजातींचे विविधरंगी पक्षी उत्तर-दक्षिण ध्रुव प्रदेशातून आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात. त्यापैकी खाडी किंवा पाणथळ जागी येणारे फ्लेमिंगो (सारस) सर्वपरिचित आहेत. परंतु इतर अनेक स्थलांतरित पक्ष्यांनी आपली वनं-काननं गजबजतात त्याचा आपल्याला पत्ताच नसतो. मुंबईतल्या आमच्या घराच्या परिसरात एक तुरेवाला ‘हुप्पु’ (हुदहुद) पक्षी आणि शेवग्याच्या मऊ खोडामध्ये ‘घर’ करणारा वुडपेकर हे माझे अनेक वर्षांचे ‘मित्र’ होते. त्यांचे फोटोही घेतले होते.

उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव असा आकाशमार्गी प्रवास करणारे छोटे मोठे पक्षी एका झेपेत पंखांवर आकाश पेलत हजारो किलोमीटरचं अंतर कापतात. यापैकी आफ्रिकन ‘टर्न’ (सुरय) हा पक्षी तीन महिन्यांत सुमारे 90 हजार किलोमीटरचं हवाई अंतर पार करतो. तो उत्तर ध्रुवाकडून निघतो नि पृथ्वीच्या दक्षिण टोकाच्या ध्रुवावर जाऊन स्थिरावतो. पुन्हा दक्षिण गोलार्धात कडक उन्हाळा सुरू झाला की उत्तरेकडे जातो.

या स्थलांतरित पक्ष्यांमुळे क्वचित एन्फ्लुएन्झा, बर्ड फ्लू अशा रोगांचा संसर्ग होऊ शकतो. परंतु बहुतेक वेळा असे पक्षी इथल्या पक्ष्यांच्या किंवा माणसांच्या थेट संपर्कात येत नसल्याने त्याची शक्यता कमी असते. अर्थात माणूसच सारखा त्यांच्या वाटेला गेला तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा सुंदर पक्ष्यांचं निरीक्षण करायचं असेल तरी जंगलभागात किंवा पाणथळ जागी दबक्या पावलाने, पक्ष्यांपासून त्यांना आणि आपल्यालाही त्रास होणार नाही अशा शांतपणे निरीक्षण करावं लागतं. पक्षीनिरीक्षणाचे असे सोपे नियम पाळले तर या अस्मानी पाहुण्यांच्या भेटीचा आनंद अवर्णनीय ठरेल हे निश्चित.