
हिंदुस्थानी तटबंदी अधिक भक्कम करणाऱ्या आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असलेली ‘तारागिरी’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेल्या निलगिरी वर्गातील (प्रोजेक्ट 17 ए) चौथे प्रगत स्टील्थ फ्रिगेट ‘तारागिरी’ युद्धनौकेचे शनिवारी जलावतरण झाले.
युद्धनौकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे हे मोठे पाऊल आहे. प्रकल्प 17 एमधील युद्धनौका विविध प्रकारच्या मोहिमांसाठी तयार केलेल्या असून सागरी क्षेत्रातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे. ‘तारागिरी’ नौदलात 1980 ते 2013 दरम्यान 33 वर्षे सेवा देणाऱ्या लेअँडर-श्रेणीतील माजी आयएनएस तारागिरीचे नवे रूप आहे. हिंदुस्थानी नौदलाच्या अत्याधुनिक, बहुउपयोगी, स्टील्थ युद्धनौकांच्या मालिकेत ‘तारागिरी’ची भर पडणे ही सुरक्षित आणि स्वावलंबी सागरी भविष्याच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे.
वैशिष्ट्ये काय?
- पाणबुडीविरोधी युद्धासाठी सज्जताशस्त्रास्त्र आणि सेन्सर्स संचामध्ये ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे-एमएफएस्टार रडार आणि एमआरएसएएम क्षेपणास्त्र प्रणाली, 76 एमएम एसआरजीएम तोफ, 30 एमएम आणि 12.7 एमएम क्लोज-इन वेपन सिस्टमचा समावेश आहे. याशिवाय पाणबुडीविरोधी युद्धासाठी रॉकेट आणि टॉर्पेडोदेखील जहाजावर बसवलेले आहेत.
- अत्याधुनिक युद्धनौकेत शिवालिक श्रेणीपेक्षा अधिक उन्नत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. पहिल्या दोन पी 17 ए युद्धनौकांच्या बांधणीतील अनुभवामुळे ‘तारागिरी’च्या बांधणीचा कालावधी 23 महिन्यांवरून 81 महिन्यांपर्यंत कमी करण्यात नौदल आणि एमडीएलला यश आले.



























































