
नेचर क्लब ऑफ नाशिकने शेकडो नागरिकांना बरोबर घेऊन तपोवनात रविवारी पक्षी निरीक्षण उपक्रम राबविला, यावेळी 52हून अधिक प्रजातींचे पक्षी आढळले. येथील वृक्षतोडीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होईल, अशी भावना अध्यक्ष आनंद बोरा यांनी व्यक्त केली.
तपोवनात घनदाट वनराई आहे, त्यामुळे तेथे असंख्य पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी यांचे वास्तव्य आहे. या जैवविविधतेमुळे शहराच्या मध्यभागी असूनही परिसर शांत, थंड आणि जिवंत भासतो. तेथील पक्षी जीवन अनुभवण्यासाठी रविवारी सकाळी सात वाजता चारशेहून अधिक नागरिक तपोवनात जमले, त्यांना कोकिळा, हरियल, तांबट, शिक्रा, स्वर्गीय नर्तक, खंडय़ा, सूर्यपक्षी, चष्मेवाला, बुलबुल, वेडाराघू, रामगंगा, वटवटय़ा आदींसह हिरवट पर्णवटवटय़ा, श्वेतकंठी वटवटय़ा, मलबारी मैना, टिकेल निळा माशीमार, लाल कंठाचा माशीमार, काळा थिरथीरा हे स्थलांतरित पक्षी देखील दिसून आले. येथील झाडे तोडली गेल्यास जैवविविधतेचे मोठे नुकसान होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद बोरा यांनी दिली. वृक्षांचे महत्त्व सांगत विविध पक्षांची ओळख करून दिली.
ज्येष्ठ पक्षीमित्र सतीश गोगटे यांनी वृक्ष आणि फुलपाखरांची, तसेच एयर क्वालिटी इंडेक्सची माहिती दिली, महापालिकेने नागरिकांना याबाबत जागरूक करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ पक्षीमित्र अण्णा देशमाने यांनी सापांविषयी माहिती देत चारोळी सादर केली. माजी उपमहापौर मनीष बस्ते यांनीही तज्ञांची समिती नेमून अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. ज्येष्ठ वृक्ष अभ्यासक प्रमोद फाल्गुने यांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले. पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी नागरिकांनी दबाव गट निर्माण करून वृक्ष वाचविण्यासाठी साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले. आकाश पाटील यांनी तपोवनातील वृक्षांवर तयार केलेला पोवाडा सादर केला. तन्मय टकले यांनी वातावरण बदलाची माहिती दिली.
या उपक्रमात ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, अमित कुलकर्णी, रोशन केदार, रवींद्र वामनाचार्य, डॉ. सीमा पाटील, डॉ. जयंत फुलकर, संजना काजवे, प्रमिला पाटील, दर्शन घुगे, आशिष बनकर, नितेश पिंगळे, योगेश रोकडे, भीमराव राजोळे, प्रमिला पाटील, भाऊसाहेब राजोळे, मनोज वाघमारे, सर्पमित्र विशाल बाफना, आनंद रॉय, पार्वती पटेल, मंजुषा पत्की, मिलिंद पत्की आदींसह पर्यावरणप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



























































