ठाणे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत मोजणार; सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रशासनाचा विशेष उपक्रम

ठाणे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या जलस्रोतांची आणि सिंचन प्रकल्पांची प्रगणना करण्याचा उपक्रम प्रशासनाने होती घेतला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून अनुभवी बाह्यसंस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. या संस्थांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील जलस्रोतांची माहिती गोळा केली जाणार आहे. जिल्ह्यातील पाणीसाठे, त्यांच्या क्षमतेची सद्यस्थिती आणि सिंचनासाठी उपलब्ध असलेली क्षमता याचा तंतोतंत आढावा घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

जिल्ह्यातील भूजल स्तर हा चिंताजनक असल्याचे विविध सर्वेक्षणातून अनेकदा समोर आले आहे. याच पाश्र्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून ठाणे जिल्ह्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील भूजल स्रोतांची गणना या उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच अंतर्गत केंद्र शासनाच्या आदेशानुसार विहिरी, कूपनलिका, शेततळी, सिमेंट बंधारे, धरण, कालवे, बंधारे, उपसा सिंचन योजना, तसेच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प अशा विविध जलस्रोतांची आणि योजनांची प्रगणना केली जाणार आहे.

अर्ज मागवले
राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या २६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास अशा प्रगणनेचा अनुभव असलेल्या संस्थांची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आता ठाणे जिल्ह्यासाठी बाह्यसंस्थांकडून अर्ज मागवले जात आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रगणना म्हणजे एखाद्या विषयाची, संसाधनांची किंवा प्रकल्पांची सरकारकडून केली जाणारी अधिकृत मोजणी आणि माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आहे.