SIR मुळे वाढला कामाचा ताण, बीएलओंनी व्यक्त केला संताप; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रक्रियेत सहभागी असलेल्या बीएलओंनी सोमवारी कोलकाता येथे निदर्शने केली. यादरम्यान बीएलओंनी कोलकातामधील निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर बराच गोंधळ घातला. पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रक्रियेत सहभागी असलेले बीएलओ गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने करत आहेत. गेल्या आठवड्यातही निषेधादरम्यान बीएलओंनी राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

निवडणूक आयोगाने कोलकाता पोलीस आयुक्तांना पत्र लिहून निवडणूक आयुक्तांच्या सुरक्षेतील त्रुटी अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले होते आणि निवडणूक अधिकाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. यातच एसआयआर प्रक्रियेत सहभागी असलेले बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) प्रचंड कामाचा ताण असल्याचा आरोप करत आहेत. एसआयआर प्रक्रियेमुळे त्यांना अमानुष ताण येत असल्याचे बूथ लेव्हल ऑफिसर्सचे म्हणणे आहे.

बंगालसह देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू असताना बीएलओंनी हे आंदोलन केले आहे. त्याच वेळी असा दावा केला जात आहे की, कामाच्या प्रचंड दबावामुळे देशभरात अनेक बीएलओंचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की, बीएलओंवर प्रचंड कामाचा ताण दिला जात आहे.