
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदे गटातील वाद टोकला गेला आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर काय डोंगर, काय झाडी फेम माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासह सांगोल्यात चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावरून काय झाडी, काय धाडी, अशी चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यातील सभा पार पडल्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची सभा झाली. ती सभा संपवून शहाजीबापू हे कार्यालयात जाताच निवडणूक आयोगाच्या (एफएसटी) भरारी पथकाने अचानक छापेमारी केली. शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर त्यांचे मित्र माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांचे घर, सांगोला शहर विकास आघाडीचे कार्यालय आणि शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांचे निकटवर्तीय असलेले सराफ व्यावसायिक क्षीरसागर यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
























































