
मतदार याद्यांमधील घोळ शोधण्यासाठी शिवसेनेने मुंबईत धडक मोहीम सुरू केली असून घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दुबार मतदार, वगळलेले मतदार आणि याद्यांमधील घोळ शोधून संपूर्ण विषयावर शिवसैनिक आणि अंगिकृत संघटना सखोल काम करीत असल्याचे शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीचे नाव तब्बल 103 वेळा असून 14 लाखांवर दुबार मतदार असल्याचे पालिकेच्याच आकडेवारीतून समोर आले आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ जाहीर कार्यक्रम आणि पत्रकार परिषदेत पुराव्यांसह उघड केला आहे. मतदार यादीतील घोळ दूर करा, अशी मागणी करीत त्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांचीही भेट घेतली. तर आता मुंबईभरात मतदार यादीतील घोळावर काम केले जात आहे.
असे होतेय काम
वरळी, प्रभादेवी, शिवडी, भायखळा, कुलाबा, मुंबादेवी, वडाळा, शीव, धारावी, कुर्ला, चांदिवली, सांताक्रुझ येथील शाखांना भेटी देऊन मतदार यादीवर काम केले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण मुंबईत हे काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
हा फक्त निवडणुकीचा विषय नाही!
‘वोट चोरी’ पकडणे हा केवळ निवडणुकीचा विषय नाही, तर निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाची प्राथमिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतः मतदार यादीत नाव आहे की नाही, हे नक्की तपासून पाहिले पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.






























































