
भंडारा येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवाराकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याची घटना घडली. या उमेदवाराने महाराजांच्या डोक्यावर भाजपची टोपी व गळ्यात कमळाचा गमछा टाकला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
भंडारा शहरात मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. प्रभाग 2 मधील भाजपच्या महिला उमेदवार प्रचारात या पुतळ्याला वंदन करण्यासाठी आल्या. त्यांनी महाराजांना वंदन करत असताना त्यांच्या गळ्यात कमळ चिन्ह असलेला गमछा घातला. त्यानंतर त्यांनी भाजपची टोपीही छत्रपतींच्या जिरेटोपावर घातली. या कृतीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावरून भाजपची लक्तरे काढली. राजकीय पक्षांमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
महाराज भाजपमध्ये असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न – शिवसेना
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्याच पक्षात आहेत, हे दाखवण्याचा हा भाजप उमेदवाराचा केविलवाणा प्रकार आहे, ही कृती निषेध व संतापाच्या पलीकडील आहे, असे शिवसेना उपनेता सुषमा अंधारे म्हणाल्या.
भाजप हा महाराष्ट्रद्रोही – काँग्रेस
भाजप महाराष्ट्रद्रोही आहे! महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान भाजप नेते वारंवार करतात. आता तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजप पक्षाची टोपी आणि दुपट्टा घातला. लाजा सोडल्यात भाजपवाल्यांनी, असे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

समाजमाध्यमांतून तीव्र संताप
या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या असंख्य पोस्ट एक्सवर पडत आहेत. राजकीय स्वार्थासाठी इतके खालच्या पातळीवर जाऊ नका, अशी कानउघाडणी संदीप तिकटे या नेटकऱ्याने केली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सिद्धांत मालवणकर या नेटिझनने आपल्या पोस्टमध्ये केली. ‘हा माज कुठून येतो’ असा सवाल करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस राजेश कदम यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला.



























































