
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधुसंताच्या सोयीसाठी साधुग्राम उभारण्यात येत आहे. त्यासाठी तपोवनातील शेकडो झाडे तोडण्यात येणार आहे. या वृक्षांच्या कत्तलीला पर्यावरण प्रेमींसह अनेक नागरिकांनी याला विरोध केला आहे. कुंभमेळा किंवा धार्मिक गोष्टींना आमचा विरोध नाही. मात्र, वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. आता यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेता, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता परक्या पण लाडक्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरसाठी नाशिककरांवरच दादागिरी करत आहेत, अशी शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, २०१४ पासून जनतेने स्थानिक आमदार भाजपचे निवडले. नगरसेवक देखील त्याच पक्षाचे… २०१७ ला महापालिका त्यांच्याच हाती दिली! परतफेड म्हणून भाजप आता परक्या पण लाडक्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरसाठी नाशिककरांवरच दादागिरी करत आहेत! खरंतर हे लोकप्रतिनिधी असायला हवेत पण ह्यांचं वेगळंच सुरूय…हे कॉन्ट्रॅक्टर प्रतिनिधी आहेत! जनतेने गांभीर्याने ह्याविषयी विचार करावा, महाराष्ट्र कोणाच्या हातात दिला आहे… परक्या कॉन्ट्रॅक्टर प्रतिनिधीच्या!, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

























































