लेख – ललित कला विद्यापीठाचे सूतोवाच : एक चिंतन

>> डॉ. गजानन सीताराम शेपाळ

महाराष्ट्राचे ‘ललित कला विद्यापीठ’ सुरू करण्याबाबत अलीकडेच राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी एका बैठकीत सूतोवाच केले. ही घोषणा खरोखरच सुखावून टाकणारी आहे. या घोषणेच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र ललित कला विद्यापीठ’ अस्तित्वात आले तर महाराष्ट्रासाठी किंबहुना देशासाठी महत्त्वाची घटना ठरणार आहे, पण… या पणमध्ये अनेक प्रश्न आणि शंका आहेत. त्यांचे निवारण केल्यास हे विद्यापीठ महाराष्ट्रासाठी दृश्य कला व ललित कलांचा ‘कलासंगम’ ठरेल अशी खात्री आहे.

‘ललित कलां’साठी राष्ट्रीय ललित कला अकादमी, नवी दिल्ली या अकादमीअंतर्गत भारतातील नवी दिल्लीसह चेन्नई, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर, गढी (नवी दिल्ली) या प्रमुख विभागीय केंद्रांशिवाय इतरही राज्यांत ‘ललित कला केंद्रे’ आहेत. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, ऑमिटी विद्यापीठ, नोएडा, मुंबई विद्यापीठाचे ललित कला विभाग व त्यांचे अभ्यासक्रम, विश्वकर्मा विद्यापीठ (MIT) पुणे, राष्ट्रीय स्तरावरील कला आणि डिझाईन संस्था (NID) अशा काही नामवंत विद्यापीठे, अकादमी आणि संस्थांमध्ये ललित कला अभ्यासक्रम सुरू आहेत. आता राज्याच्या मंत्र्यांनी घोषणा केलेल्या ‘महाराष्ट्र ललित कला विद्यापीठा’मध्ये दृश्य कलांसह इतरही ललित कलांचा अभ्यासक्रम जेव्हा सुरू होईल तेव्हा या इतर ललित कलांच्या अभ्यासक्रमात आणि वर उल्लेखलेल्या काही ललित कला संस्थांच्या अभ्यासक्रमात काही वेगळेपण असणार की तोच अभ्यासक्रम या विद्यापीठात सुरू होणार, याबद्दल स्पष्टता व्हायला हवी.

दुसरी बाब म्हणजे ‘सर जे. जे.’ हे नाव जगभर प्रख्यात आहे. या नावाची एक मर्यादित ‘डिनोव्हा डीम्ड डुबी युनिव्हर्सिटी’ सरकारी अधिपत्याखाली गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ‘सर जे. जे.’ नावाचे वलय जपत तत्कालीन कला संचालक प्रा. बाबुराव सडवेलकर यांनी 23 जुलै 1983 ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे फार दूरदृष्टीने ‘सर जे. जे. दृश्य कला विद्यापीठ’ या नावाने प्रस्ताव सादर केला होता, ज्याला तत्वतः मान्यताही मिळालेली होती. त्यामध्ये अनेक तज्ञ कलाकार, विचारवंत यांचे दाखले देत ‘सर

जे. जे.’ हे नाव किती महत्त्वाचे आणि सकारात्मक परिणाम साधणारे आहे याबद्दल निरीक्षण नोंदवलेले आहे.‘ललित कला’ या नावाने महाराष्ट्रात आणि भारतात इतरही विभाग, संस्था, अकादमी आणि विद्यापीठे आहेत. म्हणून नियोजित विद्यापीठाचे नाव ‘सर जे. जे. ललित कला विद्यापीठ, महाराष्ट्र’ असे जर ठेवण्यात आले तर निश्चितपणे वेगळेपण वाटेल.

कसे असावे?

नियोजित विद्यापीठ हे दृश्य कलांसह ‘गीतम्, वाद्यम् तथा नृत्यम्। त्रयं संगीत मूच्यते’ या उक्तीचे मूर्तस्वरूप साकारणाऱया इतर ललित कलांचा ‘संगम’ ठरावे. मी स्वतः छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय ज्ञान-विज्ञान कला महाविद्यालयाच्या संगीत विभागात दोन वर्षे गायन-वादनाचे शिक्षण घेतले. त्यामुळे सांगावेसे वाटते की, गायन, वादन, नृत्य, संगीत, लोककला या साऱया विभागांसाठी अद्ययावतता असायला हवी. त्याचबरोबर सदर विद्यापीठाच्या मुख्य दृश्य कला विभागांमध्येही परिपूर्ण प्रयोगशील अध्यापक वर्ग यांची प्रारंभापासूनच नियुक्ती करावयास हवी. सदर नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांना किमान 90 टक्के स्थान असायला हवे.

विद्यापीठाचे विभाग

चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, संगीत, नृत्य, गायन, वादन, लोककला प्रकार यांचे स्वतंत्र स्टुडियो, वर्ग, रेकॉर्डिंग रूम, नाटय़शाळा, स्टेज, ऑडिटोरियम अशा आवश्यक विविध वास्तू निर्माण करणे आवश्यक आहे.

या प्रत्येक विषयाच्या विभागामध्ये अनेक उपविभाग असतात. त्यांची स्वतंत्र दालने, वर्ग आणि संदर्भ ग्रंथालये, डिजिटल लायब्ररी यांसह स्वतंत्र प्रकाशने विभाग अद्ययावत हवेत.

विद्यापीठीय आस्थापनेचा विचार करता –

1) विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊ शकतील अशा प्राध्यापक व कर्मचाऱयांची आवश्यकता पूर्ण करावी लागेल.

2) विद्यार्थ्यांना त्यांच्या कला प्रकारांना वेळोवेळी सादर करण्यासाठी संधी देणारे उपक्रम, स्पर्धा, प्रदर्शने आणि कार्यक्रम यासाठी प्रदर्शन हॉल्स, स्टेज, ऑडिटोरियम असावेत.

3) अनुदान व निधीसंदर्भात शासनाच्या संबंधितांनी उदासीन न राहता उत्साहाने प्रोत्साहन देणे आदी व्यवस्था करावी लागेल.

सर्व प्रकारच्या कला शाखांमध्ये पदविका, पदवीपूर्व पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच. डी. आणि संशोधन केंद्रांची निर्मिती करताना आवश्यक असणाऱया शैक्षणिक शिक्षण आस्थापना आणि शिक्षण प्रशासन याबाबतीतील आवश्यक पूर्तता करावयास हव्यात.

संगीत वा इतर ललित कलांसाठी गांधर्व विद्यालय, प्रयाग संगीत विद्यालय, ब्रजसंगीत विद्यापीठाचे लोकगीत वाद्य आणि नृत्य या प्रकारांच्या विभागांची आध्यासने वा इतर दृष्टींनी संलग्न स्थापित करणे आवश्यक आहे. नृत्यांमध्ये भरतनाटय़म, कथ्थक, ओडिसी, मणिपुरी, कूचीपुडी अशा शास्त्रीय नृत्यप्रकारांसाठी आवश्यक त्या पूर्तता व्हावयास हव्यात.

महाराष्ट्रातील दृश्राव्य लोककला

या नियोजित विद्यापीठात महाराष्ट्रातील लोककला प्रकारांचा प्राधान्याने विचार करायला हवा.
पोवाडा – महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोकगीत नृत्य प्रकार, ज्यात छ. शिवाजी महाराजांचे शौर्यवर्णन केले जाते.
कोळी – मच्छीमारांचे पारंपरिक नृत्य, जे त्यांच्या उपजीविकेचे आणि संस्कृतीचे प्रदर्शन करते.
लावणी – प्रेम, राजकारण आणि समाजाच्या कथांचे चित्रण करणारा एक सुंदर व मनमोहक नृत्यप्रकार.
गोंधळ – भवानी आणि रेणुका यांना समर्पित पारंपरिक नृत्य व गायन प्रकार.
जागरण – श्री खंडोबा, ज्योतिबा यांना समर्पित जागरण नावाचा पारंपरिक नृत्य व गायन प्रकार.
तमाशा – नृत्य, संगीत आणि विनोद यांना समर्पित.

लोककलांमधील दृश्यकला

वारली, चित्रकथी, मराठा चित्रशैली, अजिंठा चित्रशैली, येवला येथील ‘वाडाचित्रे’, पिंगुळी आर्ट, रांगोळी, मराठी महिन्यांमध्ये असलेल्या सन-वार आदींचा अभ्यास आणि त्यांच्या पारंपरिकतेचा चित्र व शिल्पकलेशी संबंध कसा आहे, याचा अभ्यास तसेच या विषयांवरील अभ्यासांची आध्यासने निर्माण करावयास हवीत.

या व अशा विविध कला, दृश्य कला, लोककला, शास्त्रीय कलादी प्रकार या विद्यापीठात अद्ययावत स्वरूपात राबविण्यात आले तर हे विद्यापीठ जागतिक स्तरावर वेगळे स्थान निर्माण करेल.

वेरुळ-अजिंठय़ासह समृद्ध लेणीस्थापत्य परंपरा, छ. शिवाजी महाराजांची दिहीमान गड-किल्ले परंपरा, वाडा संस्कृतीतील प्रगल्भता, अनेक शहरांची, ऐतिहासिक स्थळांची, नैसर्गिक संपदांची, गायन, वादन प्रकारांची आणि नामशेष होऊ पाहत असलेल्या अनेक दृश्य व श्राव्य कला प्रकारांना या नियोजित विद्यापीठात अभ्यासायला मिळाले तर ‘महाराष्ट्र’ ही देशाची ‘दृश्य व दृश्राव्य’ कला शिक्षणांची श्रीमंत राजधानी ठरेल यात संदेह नाही.