
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानी लष्कर व आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष सीमारेषेजवळ 72 लाँचपॅड्स उभारले आहेत. हिंदुस्थानच्या सीमा सुरक्षा दलाने याबाबतची माहिती दिली.
बीएसएफचे उपमहानिरीक्षक विक्रम कुंवर म्हणाले, “पाकिस्तानच्या सियालकोट व जफरवाल भागातील खोल दऱयांमध्ये 12 लाँचपॅड्स सुरू आहेत. इतर वेगवेगळ्या ठिकाणी मिळून 60 लाँचपॅड्स सक्रिय आहेत. हे लाँचपॅड्स स्थायी नसतात. भारतात घुसखोरी करण्यापूर्वी दहशतवाद्यांची एखादी मोठी तुकडी भारतात घुसखोरी करणार असेल तर त्याच्या काही दिवस आधी सीमेलगत असे लाँचपॅड्स सक्रिय केले जातात. सध्या आंतरराष्ट्रीय सीमेनजीक दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र किंवा कुठलाही तळ नाही. मात्र त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. सरकारने आदेश दिले तर आम्ही शत्रूला चारीमुंडय़ा चित करण्यास सज्ज आहोत.’’
बीएसएफचे उपमहानिरीक्षक म्हणाले, ‘‘पूर्वी जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैय्यबाचे दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे. ते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांत सक्रिय असतात. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जैश व लष्करच्या दहशतवाद्यांना एकत्र ठेवलं जात आहे. त्यांना एकत्र प्रशिक्षण दिलं आहे.’’
जम्मू फ्रंटियरचे महानिरीक्षक शशांक आनंद म्हणाले, ‘‘सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला तर बीएसएफ दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. बीएसएफकडे 1965, 1971, 1999 मध्ये कारगिल युद्धाचा आणि 2025 मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या लष्करी मोहिमेत लढण्याचा अनुभव आहे. या वेळी आपण पाकिस्तानविरोधात पाऊल उचलले तर शत्रूला पूर्वीपेक्षा मोठा फटका बसेल.

























































