
मोदी सरकारचा नावे बदलण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. आता पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून ‘सेवा तीर्थ’ असे ठेवण्यात आले आहे. पेंद्रीय सचिवालयाचेही नाव बदलण्यात आले असून ‘कर्तव्य भवन’ या नावाने ते ओळखले जाईल, तर राजभवन आता ‘लोक भवन’ होईल.
मोदी सरकारने यापूर्वी दिल्लीतील अनेक ठिकाणांची नावे बदलली होती. ‘राजपथ’चे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ असे ठेवण्यात आले होते. तर पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाचे ‘रेस कोर्स रोड’ हे नावदेखील बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ असे ठेवण्यात आले होते. आता पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्यात येणार आहे. सत्तेकडून सेवेकडे ही वाटचाल आहे. हा बदल प्रशासकीय नसून सांस्कृतिक आहे, असे ‘पीएमओ’ने म्हटले आहे. राज्यपाल, नायब राज्यपाल यांचे निवासस्थान आता ‘लोक निवास’ म्हणून ओळखले जाईल, तर त्यांच्या कार्यालयांचे नाव ‘लोक भवन’ राहणार आहे.
पीएमओ नव्या वास्तूत
पंतप्रधान कार्यालय लवकरच 78 वर्षे जुन्या साऊथ ब्लॉक येथून ‘सेवा तीर्थ’ या नव्या अद्ययावत इमारतीत स्थानांतरित होणार आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा हा मोठा भाग आहे. या ठिकाणी पीएमओ, पॅबिनेट सचिवालय तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय राहणार आहे.































































