आम्ही युरोपशी युद्धासाठी तयार, त्यांचा पराभव निश्चित आहे; पुतिन यांचा इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी युरोपीय देशांना कडक इशारा दिला की, “जर युरोपने रशियाविरुद्ध युद्ध सुरू केले तर रशिया सर्व प्रकारे प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.” ते म्हणाले आहेत की, “रशियाला युरोपसोबत युद्ध नको आहे, पण जर युरोपने युद्ध सुरू केले तर प्रकरण इतक्या लवकर संपेल की शांतता कराराच्या चर्चेसाठीही कोणीही उरणार नाही.”

व्लादिमीर पुतिन यांनी दावा केला आहे की, रशिया युक्रेनमध्ये पूर्ण क्षमतेने युद्ध लढत नाहीये, तर तो सर्जिकल ऑपरेशन्ससारख्या मर्यादित ऑपरेशन्स करत आहे. ते म्हणाले, जर युरोपशी थेट युद्ध झाले तर परिस्थिती वेगळी असेल आणि रशिया पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल.

दरम्यान, युक्रेन युद्ध सुरू होऊन चार वर्षे झाली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा युरोपमधील सर्वात मोठा संघर्ष आहे. रशियाने अद्याप शेजारील युक्रेनवर पूर्णपणे ताबा मिळवलेला नाही. युक्रेनला युरोपीय देश आणि अमेरिकेकडून पाठिंबा मिळत आहे.

युरोपीय देश आणि युक्रेनचे म्हणणे आहे की, जर पुतिन युक्रेन युद्ध जिंकले तर ते कोणत्याही नाटो देशावर हल्ला करू शकतात. मात्र पुतिन यांनी हा दावा वारंवार फेटाळून लावला आहे. पुतिन म्हणाले की, युरोपीय देशांनी स्वतः रशियाशी चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत आणि म्हणूनच ते आता युद्धाच्या बाजूने आहेत.