महिलांवर अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कालचा दिवस हा महाराष्ट्रातला काळा दिवस – सुप्रिया सुळे

महाराष्टात परिस्थिती खराब होत आहे. देवेंद्रजी काही तरी करा हो राजकारण होत राहील. महाराष्ट्रामध्ये 50-60 वर्षामधील काळा दिवस कोणता आहे. तर महिलांवर अत्याचाराचा, शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आणि कालचा दिवस हा काळा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील काही भागांमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांवर पाहिली. देशाला दिशा दाखविणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात या घटना घडूच कशा शकतात अशी खेदाची भावना मनामध्ये आहे. या भूमीने सदैव लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला असून ती रुजविण्यासाठी राष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. सशक्त लोकशाही असणाऱ्या, प्रबोधनात्मक आणि संविधानात्मक विचारांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात निवडणूकीच्या दरम्यान तुंबळ हाणामाऱ्या होतात, हे सर्वथा अयोग्य, अनुचित आणि राज्याच्या लौकीकास न शोभणारे आहे. निवडणूक आयोगाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करणे आवश्यक होते. परंतु आयोगाने येथे केवळ बघ्याची भूमिका घेतलेली दिसते हे अतिशय क्लेशदायक आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या लौकीकास बट्टा लावणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. याबाबतची मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात प्रचंड शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य अर्थिक अडचणीत आहे. हे राज्य सरकारनेदेखील मान्य केले आहे. अनेक योजना खोळंबल्या आहेत. राज्याकडे पेमेंट करायला पैसे नाही. पोहरादेवीच्या कामालादेखील राज्याकडे पैसे नाहीत. इतकी वाईट अवस्था राज्याच्यी आहे. 30 हजार कोटी रुपयांचे पॅकेज महाराष्ट्र सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार होते. शेतकऱ्यांची फसवा-फसवी सुरू आहे. कपास आणि सोयाबीनची खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित सुरू नाही, तुम्ही आवाज उठवा असे अनेक शेतकऱ्यांनी मला फोन केले,असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कृषीमंत्र्यांनी भेटून काय होणार आहे? राज्याची भूमिका ही धक्कादायक आहे. याप्रकरणी मी मंत्री दत्ता भरणे यांना फोन करणार असल्याची माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या काळात न पाहिलेला दृष्य काल पाहिले. मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार दृष्य होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी कधी आत्तापर्यत इतकं गलिच्छ राजकारण पाहिलेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की, प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले.