छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ७ नक्षलवादी ठार; २ जवानही शहीद

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. यात सात नक्षलवादीही ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरू आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत, तर दोन जवानही शहीद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विजापूरच्या गंगलूर भागात ही चकमक सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना घेरले आहे. ही चकमक अजूनही सुरू आहे. गेल्या अनेक तासांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

याबाबत माहिती देताना बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून डीआरजी दंतेवाडा-बिजापूर, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून विजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागातील पश्चिम बस्तर विभाग परिसरात संयुक्त शोध मोहीम सुरू आहे. या कारवाईदरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार होत होता.

बस्तर रेंजचे महानिरीक्षक सुंदरराज पट्टलिंगम यांनी सांगितले की, चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. एसएलआर रायफल्स, ३०३ रायफल्स आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. या चकमकीत डीआरजी विजापूरचे दोन सैनिक, हेड कॉन्स्टेबल मोनू वदादी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले.