
बांगलादेशचा माजी लष्करप्रमुख अब्दुल्लाहिल अमान आझमी याने हिंदुस्थान विरोधात अत्यंत भडकाऊ विधान केले आहे. आझमी म्हणाला आहे की, बांगलादेशात तोपर्यंत शांतता येणार नाही, जोपर्यंत हिंदुस्थानचे तुकडे होत नाही. ढाका येथील राष्ट्रीय प्रेस क्लबमध्ये एका कार्यक्रमादरम्यान तो असा म्हणाला आहे.
हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकत अब्दुल्लाहिल अमान आझमी म्हणाला की, बांगलादेशात जी काही अशांतता आहे, त्याला हिंदुस्थान जबाबदार आहे. आझमी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात तो म्हणताना दिसत आहे की, “हिंदुस्थान जगाच्या अंतापर्यंत आम्हाला शांततेने जगू देणार नाही. हिंदुस्थानने आमच्या मीडिया, आमची संस्कृती, सर्वत्र हस्तक्षेप केला आहे.”
आझमीने आरोप केला आहे की, बांगलादेशच्या आग्नेयेस असलेल्या आणि हिंदुस्थानच्या सीमेला लागून असलेल्या चितगाव हिल ट्रॅक्ट्स प्रदेशात १९७५ ते १९९६ दरम्यान जी अशांतता होती त्यालाही हिंदुस्थान जबाबदार आहे. अब्दुल्लाहिल अमान आझमी हा जमात-ए-इस्लामीचा माजी प्रमुख असून तो गुलाम आझमी याचा पुत्र आहेत. गुलाम आझमी याला १९७१ च्या मुक्तिसंग्रामादरम्यान स्वातंत्र्यसमर्थक बंगाल्यांविरुद्ध नरसंहार घडवल्याबद्दल दोषी ठरवले गेले होते.


























































