
>> अॅड. कॉ. प्रदीप नागापूरकर
महाराष्ट्राच्या समाजवादी परंपरेतील एक तेजस्वी दीप आज मावळला. ज्येष्ठ समाजवादी नेते, निर्भय विचारवंत आणि लोकहितवादी राजकारणी पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एका व्यक्तीचा नाही, तर तत्त्वनिष्ठ सार्वजनिक जीवनाच्या एका कालखंडाचा अंत झाल्याची जाणीव महाराष्ट्राला झाली आहे.
त्यांना लोकहितवादी राजकारणी म्हणणे आजच्या तरुण पिढीला कदाचित अनोळखी किंवा चुकीचेही वाटेल. कारण त्यांच्याकडे कधीही सत्ता, पद किंवा राजकीय वैभव नव्हते. आजच्या काळात राजकारणी म्हटले की, सत्तेच्या महालातील प्रमुख आणि मालदार स्थान महत्त्वाचे मानले जाते, पण सुराणा यांचे राजकारण हे सत्तेपेक्षा मूल्यांवर उभे होते. त्यांनी कधीच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला नाही किंवा पदांची आकांक्षा बाळगली नाही. त्यांच्यासाठी राजकारण हे पदप्राप्तीचे साधन नव्हते, ते समाज परिवर्तनाचे, लोकजागृतीचे आणि नैतिकतेचे माध्यम होते.
तरुणपणी बार्शी येथे शिक्षण घेत असताना त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संपर्क आला आणि तिथूनच त्यांच्या मूल्याधिष्ठत प्रवासाची सुरुवात झाली. पुढे ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सेखोदेवरा येथील सरोदे आश्रमातही राहिले. भूदान चळवळ, जनआंदोलने आणि समाजवादी विचारसरणीच्या पुरस्कृत लढय़ांत त्यांचा सहभाग होता. आणीबाणीत सत्तेच्या बेबंदशाही विरुद्ध त्यांनी आपल्या लेखणीतून कठोर प्रहार केले. त्यामुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली. समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणून काम करताना त्यांनी सत्ता किंवा पदाचा मोह न धरता संघटन, विचारप्रबोधन आणि लोकसंवादावर भर दिला.
त्यांचे राजकारण म्हणजे स्वच्छता, पारदर्शकता आणि निर्भीड समाजनिर्मितीचा मार्ग. त्यांनी ज्या पद्धतीने सार्वजनिक जीवन जगले, त्यावरून त्यांच्या राजकारणात येण्यामागे सत्ता नव्हे, तर सुसंस्कृत समाज घडवण्याची धग होती, हे स्पष्ट होते.
सत्ता, पदे, स्वार्थ आणि राजकीय समीकरणांच्या वावटळीतही पन्नालालजी सुराणा ‘साधी राहणी, उच्च विचार’ या गांधीवादी मूल्यांशी निष्ठावंत राहिले. त्यांनी राजकारणाला व्यवसाय नव्हे, तर जनसेवा व विचारसाधना यांचे माध्यम मानले. तत्त्वांशी तडजोड न करता समाजवादी विचारांच्या पूर्ततेसाठी त्यांची आयुष्यभर धडपड सुरूच राहिली.
आजच्या राजकारणात मूल्यांची घसरगुंडी, निष्ठा बदलण्याचा खेळ आणि नैतिकतेचा अभाव दिसतो. या परिप्रेक्ष्यात सुराणा यांचे व्यक्तित्व राजकारणाला मूल्यांचा कणा देणारी जिवंत शिदोरी होते.समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी त्यांनी राजकारणाबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रातही मोठे काम केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ‘दैनिक मराठवाडा’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली. शासनाच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध कठोर शब्दांत लिखाण केले. त्यामुळे त्यांना शासनकर्त्यांचा रोष पत्करावा लागला. या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांना कठोर यातनाही सहन कराव्या लागल्या. त्या त्यांनी समाज परिवर्तनासाठी अत्यंत धीरोदात्तपणे सहन केल्या. जनहिताचे मुद्दे, अन्यायग्रस्तांची बाजू आणि सत्तेच्या अहंकाराविरुद्ध आवाज उठवताना त्यांनी कधी माघार घेतली नाही. प्रसंगी जनहितासाठी त्यांनी ‘असत्या’विरोधात आणि ‘सत्ता’धीशांविरुद्ध कठोर भूमिका घेतल्या. त्यांच्या लेखणीचा प्रभाव आणि विचारांचा धडाका इतका तीव्र होता की, त्यांना त्या काळात तुरुंगवासही भोगावा लागला. एक पत्रकार, एक कार्यकर्ता आणि एक जननेता म्हणून त्यांनी घेतलेली ही जोखीम त्यांच्या धाडसाची व तत्त्वनिष्ठतेची साक्ष देते.
गेल्या दहा-बारा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात मूल्याधिष्ठत नेत्यांची संख्या कमी होत आहे. पक्षांतर, सत्ता समीकरणे, संधीवाद आणि व्यक्तिपूजक प्रवृत्ती वाढताना दिसतात. या परिस्थितीत पन्नालालजींच्या सारखे धैर्यवान, तत्त्वनिष्ठ, स्वच्छ चारित्र्य आणि विचारांचे नेते अधिक आवश्यक होते. त्यातूनच भोगवाद आणि त्यागवाद यातील फरक ते प्रखरतेने समाजासमोर मांडू शकले असते. त्यांचे विचार आणि त्यांची तडजोड न करणारी सार्वजनिक जीवनाची शैली आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकली असती.
वय आणि शरीराच्या मर्यादा असूनही पन्नालाल सुराणा शेवटपर्यंत सक्रिय व समाजाभिमुख राहिले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेतृत्व, सुसंस्कृतपणा, बौद्धिकता आणि नैतिकता यांचे अनोखे मिश्रण होते. ते खऱया अर्थाने महाराष्ट्रासाठी एक दीपस्तंभ होते, जो अंधकारातही दिशा दाखवत राहतो.






























































