
‘वंदे मातरम्’ नाकारणारे एकीकडे अयोध्येत धर्मध्वजा फडकवतात व दुसरीकडे हिंदू धर्माची मंदिरे पाडतात. धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढले आहे. एकीकडे धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढायचे आणि दुसरीकडे धर्माचेच कारण सांगत नाशकातील सिंहस्थात हजारो वृक्षांची कत्तल करायची. भाजप हा दांभिकपणा सर्वत्र करत आहे. मोगलाईत मंदिरे तोडली म्हणून छाती पिटणारा भाजप बाबराच्याच मार्गाने निघाला आहे. संघ परिवार, भाजप मंदिरे तोडत आहेत व त्यांचे भक्त ‘नमो नमो’च्या नकली हिंदुत्वात गुंग आणि धुंद झाले आहेत. हे नकली हिंदुत्व त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो!
नकली हिंदुत्वाचे दुसरे नाव भारतीय जनता पक्ष यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत राममंदिरावर धर्मध्वजा फडकवली तेव्हा देशात हिंदू राष्ट्र निर्माण झाल्याचे शंख भाजप आणि त्याच्या अंधभक्तांनी फुंकले. मात्र सत्य असे आहे की, भाजप काळात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे जेवढे नुकसान झाले तेवढे मोगल काळातही झाले नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे तथाकथित हिंदू राष्ट्रवाले हिंदूंच्या पुरातन धर्मस्थळांवर मोगली पद्धतीने बुलडोझर फिरवतात तेव्हा हिंदुत्वासाठी बलिदान दिलेल्या आत्म्यांची काय तडफड होत असेल? झंडेवाला परिसरात म्हणजे दिल्लीत 1400 वर्षे जुन्या मंदिरावर भाजप सरकारने बुलडोझर चालवला. दिल्लीतील हिंदू समाजाचे हे सगळ्यात जुने श्रद्धास्थान होते. या मंदिरात हनुमानासह इतर देवदेवतांचा वास होता, पण येथे प्रखर हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या हिंदुत्वाचे, ‘गौतम अदानी’चे मुख्यालय नव्याने झाले. खुद्द पंतप्रधान कार्यालयातून ‘फेक अदानी देवा’चीच पूजा होत असल्यावर यापेक्षा वेगळे काय होणार? त्याच वेळी संघ मुख्यालयात पार्किंग व्यवस्था नीट व्हावी म्हणून ‘केशवकुंज’च्या सोयीसाठी तेथील पुरातन मंदिरावर व आजूबाजूच्या हिंदू लोकांच्या घरांवरदेखील बुलडोझर कारवाई करण्यात आली. हा बुलडोझर इतका निर्घृणपणे फिरला की, एका क्षणात मंदिराचा मातीचा ढिगारा झाला व मंदिर तोडण्यास विरोध करणाऱ्या हिंदूंना पोलिसांनी लाठीमाराने शांत केले. या मंदिराचा इतिहास पुरातन आहे. हे मंदिर किमान 800 वर्षांचा इतिहास सांगते. 1947 साली देशाच्या विभाजनानंतर बाबा रतननाथ हे पेशावरमधून दिल्लीत आले व त्यांनी या मंदिरात आपला मुक्काम केला. तेव्हापासून हे मंदिर त्यांच्या नावाने ओळखले जाते व फाळणी काळातील विस्थापितांचे हे श्रद्धास्थान बनले. हे सर्व लोक हिंदुत्ववादी व भाजपचे समर्थक मानले जातात. तरीही ‘संघ’ मंडळाच्या गाड्याघोड्यांच्या पार्किंगसाठी हिंदूंच्या श्रद्धास्थानावर
बुलडोझर फिरवला
गेला. अयोध्येतील मंदिर बाबराने तोडले म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा त्यामुळे समोर आला. बाबराने जितकी मंदिरे तोडली नसतील त्यापेक्षा जास्त मंदिरे व हिंदू धार्मिक स्थळांवर भाजपने बुलडोझर फिरविले. वाराणसीत विकासाच्या नावाखाली 1100 पुरातन मंदिरे तोडण्यात आली व त्या मंदिरांतील पुरातन मूर्ती गायब करण्यात आल्या. वाराणसीतले ठेकेदार मंदिर तोडण्याचे काम करायला तयार नव्हते तेव्हा हे करण्यासाठी सर्व ठेकेदार गुजरात येथून बोलावले व मंदिरांवर हातोडे मारण्यात आले. अशा लोकांच्या हाती आज हिंदू धर्मध्वजा आहे. एका बाजूला गाईस गोमाता म्हणायचे, गोमांसाविरुद्ध आंदोलने बडवायची व त्याच वेळी भाजपचे ईशान्येकडील मंत्री गोमांस खातात याचे समर्थन करायचे. भारत हा मोदी काळात गोमांस निर्यात करणारा महत्त्वाचा देश बनला आहे. भारतातील गोमांसाला जगात मागणी आहे व या गोमांस निर्यातदार कंपन्यांनी भाजपच्या तिजोरीत शेकडो कोटींचे ‘दान’ दिले. गायी कापणाऱ्यांकडून ‘चंदा’ घेणाऱ्यांनी आता धर्मध्वजा फडकवली. अयोध्येत राममंदिर उभे राहिले. त्याआधी तेथेही अनेक पुरातन मंदिरे व मठांवर बुलडोझर फिरवले. मध्य प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यात अनेक मंदिरे पाडली गेली. हे मंदिर पाडण्याचे काम एखाद्या काँगेसशासित राज्यात घडले असते तर भाजपने रस्त्यावर उतरून हिंदुत्वाच्या नावाने नंगानाच केला असता. देशातले साधू वगैरे लोक रस्त्यावर उतरवले असते व राज्यकर्त्यांना हिंदुद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले असते, पण आता मंदिरे पाडली जात आहेत ती भाजप काळात व सर्व कसे चिडीचूप आहेत. राममंदिरास विरोध करणाऱया नितीश कुमारांना मोदीसाहेब मिठय़ा मारत आहेत व ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने अयोध्येतील राममंदिर आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली, अयोध्या दंगलीनंतर हिंदूंच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावली, त्या शिवसेनेस दुश्मन मानून हिंदुत्वावरच बुलडोझर फिरवला जात आहे.
भाजपचे हिंदुत्व नकली
तसेच ढोंगी व स्वार्थी आहे. ही मंडळी पेगासस म्हणजे राजकीय हेरगिरी सर्रास करते. या राजकीय हेरगिरीला हिंदुत्वात काय स्थान आहे? देशात हिंदुत्वाची ठेकेदारी फक्त आपल्याकडेच राहावी. इतर कोणी हिंदुत्वाचा गजर केला तर त्यांना पैसा व सत्तेच्या बळावर संपवून टाकू ही भाजपची एकंदरीत योजना आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली भाजपचे गौतम अदानी बुलडोझर चालवतील. त्यात अनेक मंदिरांना प्राणत्याग करावा लागेल, पण भाजप किंवा त्यांच्या खिशातील नकली शिवसेनावाले या मंदिर बलिदानावर एकही शब्द बोलणार नाहीत. कारण पैशांच्या राशीखाली त्यांचे हिंदुत्व चिरडले गेले आहे. संसदेत ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’वर बंदी घालणारे सरकार अयोध्येत धर्मध्वजा फडकवण्याचे ढोंग करते व त्या ढोंगाला अंधभक्त नमस्कार करतात हा चमत्कार देशाला खड्ड्यात घालणारा आहे. ज्या ‘वंदे मातरम्’ने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असंख्य क्रांतिकारक ‘वंदे मातरम्’चा गजर करीत फासावर गेले ते ‘वंदे मातरम्’ सत्ताधाऱ्यांना नकोसे झाले आहे. ‘वंदे मातरम्’ नाकारणारे एकीकडे अयोध्येत धर्मध्वजा फडकवतात व दुसरीकडे हिंदू धर्माची मंदिरे पाडतात. धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढले आहे. एकीकडे धर्मध्वजावर वृक्षाचे चित्र काढायचे आणि दुसरीकडे धर्माचेच कारण सांगत नाशकातील सिंहस्थात हजारो वृक्षांची कत्तल करायची. पंतप्रधान मोदी स्वतःला जनतेचा ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात, परंतु जनतेपेक्षा त्यांच्या ‘उद्योगपती मित्रा’चीच सेवा त्यांच्या राजवटीत जास्त होत आहे. नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानाचेही मोदींनी आता ‘सेवातीर्थ’ असे नामकरण केले. त्याचबरोबर राजभवन आणि राजनिवास यांची नावेही ‘लोकभवन’ तसेच ‘लोकनिवास’ अशी करण्यात आली आहेत. मग आता राज्यपालांचेही ‘भाजपपाल’ असे नामांतर करून टाका. किती हा भंपकपणा! भाजप हा दांभिकपणा सर्वत्र करत आहे. मोगलाईत मंदिरे तोडली म्हणून छाती पिटणारा भाजप बाबराच्याच मार्गाने निघाला आहे. संघ परिवार, भाजप मंदिरे तोडत आहेत व त्यांचे भक्त ‘नमो नमो’च्या नकली हिंदुत्वात गुंग आणि धुंद झाले आहेत. हे नकली हिंदुत्व त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो!






























































