ऑरेंज गेट ते मरीन लाइन्स बोगद्यामुळे दक्षिण मुंबईची वाहतूककोंडी फुटणार, तीन वर्षांत प्रकल्प पूर्णत्वाला

दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा तयार करण्यात येणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी फुटण्यास मदत होईल. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)चे लोकार्पण करण्यात आले. हा बोगदा जवळपास 700 मालमत्तांच्या खालून, 100 वर्षे जुन्या हेरिटेज इमारती तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन्सखालून जाणार आहे. विशेष म्हणजे, हा बोगदा मेट्रो-3 च्या 50 मीटर खाली खोदला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थाने ‘इंजिनीअरिंग मार्व्हल’ ठरणार असल्याचे फडणवीस म्हणाले.