सरकारला भीती म्हणून विदेशातील नेत्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू देत नाही, पुतीन यांच्या दौऱ्यावरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आजपासून दोन दिवसांच्या हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते आणि विदेशातील नेत्यांची भेट मोदीजी आणि परराष्ट्र मंत्रालय होऊ देत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हिंदुस्थान भेटीच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरात पत्रकारांनी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला. हिंदुस्थान भेटीवर असलेल्या विदेशातील प्रमुख नेत्यांची भेट विरोधी पक्षनेतेशी होणं ही आपली एक परंपरा आणि एक संकेत आहे. ही परंपरा अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या काळातही पाळली गेली. पण सध्या हिंदुस्थानच्या भेटीवर आलेल्या विदेशातील प्रमुख पाहुण्यांना किंवा आम्ही विदेश भेटीवर गेल्यावर केंद्र सरकार त्यांना सांगते की विरोधी पक्षनेत्याला भेटू नये. हे या सरकारचे धोरण आहे. हे सतत्याने घडत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

विरोधी पक्षनेते हे दुसरा दृष्टीकोन मांडत असतात. फक्त सरकारचं नाही तर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व आम्हीही करतो. विरोधी पक्षनेत्यांनी बाहेरच्या नेत्यांना भेटू नये, हा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, विरोधी पक्षनेत्याची भेट होणं हा एक संकेत आहे आणि परंपराही आहे. पण मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय हे संकेत पाळत नाही. सरकारमध्ये एक प्रकारची भीती आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

हिंदुस्थान भेटीवर आलेले विदेशातील कोणतेही नेते हे विरोधी पक्षनेत्यांना भेटतात, हा एक लोकशाहीतील प्रटोकॉल आहे. पण विरोधकांचा आवाज दाबण्याचे या सरकारचे धोरणच आहे. इतरांची बाजू ऐकतच नाही. आणि जे प्रोटोकॉल आहेत तेही तोडत आहेत. देवालाच माहिती सरकारला कशाची भीती आहे? सरकारमध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना यातून दिसून येते, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली.