निवडणुकीच्या फक्त तीन महिन्याआधी SIR का लागू करण्यात आला? ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

एसआयआरच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुर्शिदाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या आहेत की, “पश्चिम बंगाल निवडणुकीच्या फक्त तीन महिन्याआधी जाणीवपूर्वक एसआयआर का लागू करण्यात आला?” त्या म्हणाल्या की, फक्त विरोधी पक्षशासित राज्यांना लक्ष्य केले जात आहे, तर आसाम आणि त्रिपुरा सारख्या राज्यांमध्ये ते लागू केले जात नाही.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “बिहारमधील गोदी सरकारने आधी निवडक लोकांना त्यांची मते खरेदी करण्यासाठी १०,००० रुपये दिले आणि निवडणुकीनंतर बुलडोझर चालवले. त्यांनी लोकांना केंद्रीय अनुदानांवर अवलंबून राहू नये आणि त्याऐवजी राज्य सरकारच्या सामाजिक योजनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.

देशभरातील बंगाली भाषिक लोकांना लक्ष्य केले जात आहे आणि त्यांना जबरदस्तीने बांगलादेशी म्हणून लेबल लावले जात आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. सोनाली खातून प्रकरणाचा संदर्भ देत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एका गर्भवती महिलेला बेकायदेशीरपणे बांगलादेशात पाठवण्यात आले होते आणि तिला परत आणण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बंगालबद्दल इतका द्वेष का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि भाजप बंगालविरोधी असल्याचा आरोप केला. एसआयआरच्या नावाखाली डिटेंशन कॅम्प उभारले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.