
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ शिवसेना आणि मनसेसह विरोधी पक्षांनी सातत्याने चव्हाटय़ावर आणला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाला जाग आली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करा तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निदर्शनास आल्यास तक्रारींची वाट न पाहता स्वतःहून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
मतदार याद्यांसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी आज ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 3 डिसेंबरपर्यंत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा, असे वाघमारे यांनी सर्व आयुक्तांना सांगितले.
निवडणूक आयुक्तांनी यावेळी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार दाखवण्यात आलेले आहेत. असा मतदार कुठल्या मतदान पेंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान पेंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान पेंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान पेंद्रावर मतदान करता येणार नाही.
निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते.






























































