
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आता नवी तारीख दिली. एप्रिल 2026 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी आज लोकसभेत दिली.
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ‘मुंबई-गोवा हायवेला चांद्रयान मोहिमेपक्षाही जास्त खर्च आला आहे. तरीही रस्ता पूर्ण झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. आपण यात स्वतः लक्ष घालावे,’ अशी मागणी सावंत यांनी केली.
मुंबई-गोवा हायवेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व कोकणवासीयांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेना सातत्याने पाठपुरावा करत आहे. यापूर्वीदेखील शिवसेनेच्या सदस्यांनी या प्रश्नावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत आवाज उठवला आहे. त्याशिवाय, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनेही झाली.
उशीर झाला हे मान्य!
‘मुंबई-गोवा हायवेचे काम 2009 साली सुरू झाले. तेव्हापासून या कामात अनेक अडथळे आले. भूसंपादनाला विरोध झाला. वारंवार पंत्राटदार बदलावे लागले. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही पंत्राटदारांवर कारवाईदेखील करण्यात आली. या सगळय़ामुळे रस्त्याला उशीर झाला हे मान्यच करावे लागेल. मात्र आता रस्त्याचे 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होईल,’ असे त्यांनी सांगितले.




























































