सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वडाळ्यातून अंधेरी पूर्वेला स्थलांतर;शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

वडाळा ट्रक टर्मिनस येथे असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अखेर अंधेरीच्या पूर्वेला स्थलांतर झाले आहे. शिवसेनेच्या तत्कालीन आमदार ऋतुजा लटके यांनी तसेच जोगेश्वरी विधानसभेचे विद्यमान आमदार अनंत नर यासाठी सहकार विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर यांच्या मागणीला यश आले असून उद्या अंधेरीतील (पूर्व) नव्या सहाय्यक निबंधक कार्यालयाचे उद्घाटन होत आहे.

 अंधेरीचे शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांनी हे कार्यालय अंधेरीत स्थलांतर करण्याची सर्वप्रथम मागणी केली होती. त्यानंतर ऋतुजा लटके, अनंत नर यांनी विधानसभेत या समस्येवर वारंवार आवाज उठवला होता. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व भागातील रहिवाशी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था व बँकांना कामकाजासाठी वडाळा ट्रक टर्मिनस येथील सहकार विभागाच्या उपनिबंधकांच्या कार्यालयात जावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी, वेळ व पैशाचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होतो. परिणामी सहकार उपनिबंधकांचे कार्यालय अंधेरी पूर्व येथे स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी तारांकित प्रश्नद्वारे विधानसभेत केली होती. त्याशिवाय त्यांनी तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांना डिसेंबर 2022मध्ये पत्र पाठवून हे कार्यालय अंधेरी पूर्व येथे स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.

माजी आमदारांना उद्घाटनाचे आमंत्रण नसल्याने स्थानिकांत नाराजी

सांस्कृतिक कार्य मंत्री व उपनगर जिह्याचे पालक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. वास्तविक या कार्यालयासाठी मागील चार ते पाच वर्षे सतत पाठपुरावा केला. पण या उद्घाटन सोहळ्याला महायुती सरकारने ऋतुजा लटके यांना निमंत्रणच दिलेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.