
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात स्नोहभोजनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. शशी थरुर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावरून शशी थरुर काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत अनेक देशांना माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात थरुर यांचा समावेश होता. आता पुन्हा एकदा त्यांना स्नेहभोजनाच्या मिळालेल्या निमंत्रणावरून राजकीय चर्चा होत आहे.
तुम्ही काँग्रेस सोडणार का, असा सवाल थरुर यांना पत्रकरांनी केला, त्यावर ते म्हणाले, आम्ही विरोधक असलो तरी काही बाबींवर आम्ही सहमत आहोत. राष्ट्रहिताचा सरकारच्या धोरणात आमचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाला आपली उपस्थिती परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या कामाशी संबंधित आहे. मी माझे कर्तव्य पार पाडत आहे, असे थरुर यांनी स्पष्ट करत पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.
परदेशांशी असलेले संबंध संसदीय स्थायी समिती ज्या गोष्टींशी संबंधित आहेत, त्यामुळे संभाषणात, वातावरणात आणि इतर गोष्टींमध्ये काय चालले आहे याबद्दल थोडीशी माहिती असणे उपयुक्त ठरते. म्हणून मी येथे आलो आहे. पवन खेरा आणि जयराम रमेश यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील मल्लिकार्जुन खरगे यांना राज्य भोजनासाठी आमंत्रित न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेत्यांना पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट नसल्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की निमंत्रणे कोणत्या आधारावर पाठवण्यात आली हे त्यांना माहिती नाही, परंतु त्यांना आमंत्रित केल्याचा त्यांना निश्चितच सन्मान वाटतो.
खासदार म्हणून सरकारला सहकार्य करणे आणि काम करणे हे आपले कर्तव्य आहे.लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील सहकार्याचा एक भाग म्हणजे समान आधार शोधणे. आम्ही काही गोष्टींवर असहमत आहोत, काही गोष्टींवर आम्ही सहमत आहोत आणि जिथे आम्ही सहमत आहोत तिथे आपण एकत्र काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. मी काँग्रेस पक्षाचा खासदार आहे. निवडून येण्यासाठी मी खूप कष्ट केले. त्यामुळे सध्या दुसरा कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

























































