
राज्यात निवडणुकांचा काळ सुरू असला तरी या निवडणुकीत प्रचंड गडबड घोटाळा सुरू आहे. मुंबईसह इतर शहरांमधल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. असा वाईट अनुभव यापूर्वी कधीही आलेला नाही. असे असताना घोळाबाबत कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय जसे भटक्या कुत्र्यांबाबत लक्ष घालते तसे मतदार याद्यांमधील घोळांकडे लक्ष घालायला हवे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
‘मातोश्री’ निवासस्थानी भाजप, छावा स्वराज्य सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकाऱयांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळावर सडकून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करून ही बाब लक्षात आणून दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
मराठींना घर नाकारणाऱयांना तडीपार करा!
भाईंदरमध्ये मराठी कुटुंबाला घर नाकारणाऱयांचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. खाण्यावरून किंवा मराठी म्हणून जातीय वाद फैलावण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. मात्र अशा प्रकारे कुणी जर मराठी माणसाला घर नाकारलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तडीपार केले पाहिजे, तुरुंगात टाकले पाहिजे असा संताप त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱयांना मदत कधी?
सरकारकडे आपत्ती जाहीर करण्यासाठी ‘ओला दुष्काळ’ ही संज्ञाच नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता तर पेंद्रीय कृषिमंत्र्यांनी प्रस्तावच आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रस्ताव जाणार कधी? केंद्राची मदत राज्याकडे येणार कधी? आणि शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होणार कधी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी सत्तापिपासूपणामुळे कुठल्याही थराला जात आहेत. हे जनतेच्या हिताचे नाहीय. स्वतःच्या पक्षाची आणि स्वतःच्या लोकांची घरं भरायची याच दिशेने वाटचाल सुरू आहे. अशा वेळी सुजाण नागरिक शिवसेनेकडे येत आहेत. कारण शिवसेनेकडे मशालीचा प्रकाश दिसतोय!
…तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा!
दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता पद नाही असे कधी इतिहासात घडलेले नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता निवडा अशी मागणी आम्ही वर्षभरापूर्वी अधिवेशनातही केली, मात्र वर्षभरात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. फक्त जाहिराती सुरू आहेत. सत्ताधारी विरोधी पक्षनेत्याला घाबरत आहेत. तुमचे सरकार मजबूत आहे. दिल्लीचा तुम्हाला पाठिंबा आहे. भ्रष्टाचारी पक्षात घेऊन त्यांच्यावर तुम्ही पांघरूण घातलेय. मग विरोधी पक्षनेत्याला का घाबरता, असा सवालही त्यांनी केला. जर विरोधी पक्षनेता निवडत नसाल तर उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा. कारण संविधानात उपमुख्यमंत्रीपदाची कोणतीही तरतूद नाही. मग त्यांच्याकडे कुठल्या तिजोऱया किंवा बाथरूमच्या चाव्या द्यायच्यात द्या, असा टोलाही त्यांनी लगावला. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्षनेता निवडलाच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘अॅनाकाsंडा’ दोन्ही पक्षांना गिळणार!
महायुतीत तीन पक्ष असले तरी खरे तर तो एकच पक्ष आहे. फक्त तिघांची नावे आणि निशाणी वेगवेगळय़ा आहेत. दोन्ही पक्ष म्हणजे भाजपच्या ‘बी’ टीम आहेत. त्यांचा मालीक एकच आहे. मात्र हा अॅनाकाsंडा दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय राहणार नाही! कारण गरज सरो वैद्य मरो, अशीच त्यांची वृत्ती आहे. महापालिकेवर त्यांना कब्जा करायचा असल्याने ते कोणत्याही थराला जातील, असेही ते म्हणाले.































































