देव संधी देतो, परंतु ध्येय साध्य करणे आपल्या हातात; डीके शिवकुमार यांचे संकेत

कर्नाटकातील अंतर्गत सत्तासंघर्षादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी नवीन ताकदीने उभे राहत नवीन बदल घडवण्याचा काळ आहे, असे वक्तव्य केले आहे. देव संधी देतो, परंतु ध्येय साध्य करणे आपल्या हातात आहे, असे स्पष्ट करत त्यांनी राजकारणात महत्त्वाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. तसेच नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियाला देणग्यांसंदर्भात ईडीच्या समन्सवर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एक महत्त्वाचा राजकीय संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की, राज्यात नवीन ताकदीने उभे राहत नवीन बदल घडवण्याचा काळ आहे, असे स्पष्ट केले. त्यांनी नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियाशी संबंधित प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेले समन्स सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले की, एखादी व्यक्ती या जगात रिकाम्या हाताने येते आणि रिकाम्या हाताने निघून जाते, परंतु त्याचे कार्य कायम स्मरणात राहते. आपले सरकार अनेक महत्त्वाच्या कामगिरी साध्य करत आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक मजबूत वारसा सोडण्याचे उद्दिष्ट ठेवते, असे ते म्हणाले.

देव आशीर्वादही देत नाही किंवा शाप देत नाही, तो फक्त संधी देतो. आपण त्या संधींचे काय करतो हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपला जन्म आपल्या हातात नाही, परंतु आपले ध्येय साध्य करणे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि हेच आपले सरकार करत आहे, असे सांगत त्यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियाला दिलेल्या देणग्यांबाबत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सवर डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सांगितले की ईडी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जाणूनबुजून त्रास देत आहे. नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियाला देणग्या दिल्याच्या आरोपावरून ईडीने आम्हाला समन्स बजावले आहे. आम्हाला त्रास दिला जात आहे. हे योग्य नाही आणि मी त्याचा निषेध करतो.

डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले की जेव्हा काँग्रेसशी संलग्न संस्था कठीण काळातून जात होत्या तेव्हा त्यांनी नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियाला देणगी दिली. त्यांनी सांगितले की ते एक काँग्रेसी आहेत आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या ट्रस्टद्वारे या संस्थांना मदत केली. त्यांच्या मते, त्यांचे भाऊ डीके सुरेश यांनीही खासदार असताना काही देणग्या दिल्या होत्या. त्यांनी सांगितले की शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली आहे आणि आता ते कायदेशीररित्या नोटीसचा आढावा घेतील आणि त्यांची भविष्यातील रणनीती ठरवतील.