तक्रार केली की कर्मचाऱ्यांना अपमानिक केलं जातं… इंडिगोविरोधात वैमानिकाचं निनावी पत्र

इंडिगो एअरलाइन्सचा गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. आतापर्यंत अडीच हजारापेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी अचानक संप केल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे बोलले जात आहे. या गोंधळादरम्यान इंडिगोच्या एका वैमानिकाने निनावी पत्र लिहीत एअरलाईन्सवर ताशेरे ओढले आहेत.

हे सर्व जे सुरू आहे ते मी बघत आहे. ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती काही एक दिवसात झालेली नाही. हे गेल्या काही वर्षांमध्ये झालेले आहे. 2006 मध्ये इंडिगो एअरलाईन्स सुरू झाली. सुरुवातीच्या काळात कंपनीने चांगली प्रगती केली. मात्र अहंकार आणि अभिमान यात जी सीमारेषा असते ती त्यांना कळलीच नाही व तिथूनच हे सर्व सुरू झालं. एअलाईन्सने जेव्हा अनुभव नसलेल्या आणि योग्यता नसलेल्या लोकांना मोठ्या पदांवर बसवलं तेव्हाच प्रगतीचा आलेख कोसळणार हे स्पष्ट झालं होतं. हे असे लोक होते ज्यांच्याकडे कंपनी चालवण्याची समजही नव्हती आणि कुठलाही विशेष गुणही नव्हता. वैमानिक असो किंवा कर्मचारी त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होतं. कामाच्या वाढत्या तासांमुळे थकवा येत होता. तसे कंपनीला सांगितले तर आमचा अपमान केला जायचा. कोणताही अतिरिक्त अलाऊन्स दिल्याशिवाय कामाचे तास वाढवले जायचे. हा त्रास वाढत चालला होता. भिकाऱ्यांकडे कोणताही ऑप्शन नसतो असा आमच्यापैकी एकाचा अपमान करताना सुनावले होते. कंपनीत गढूळ आणि विषारी वातावरण तयार होत. इंडिगोचा आलेख खालावणार होताच तो खालवला”, असे या वैमानिकाने म्हटले आहे.