खडेगोळवलीतील उद्यान शिवसेनेने केले खुले; सत्ताधाऱ्यांना उ‌द्घाटनासाठी वेळच नाही

कल्याण पूर्वेच्या खडे गोळवली गावातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचे पालिकेने लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण केले. बच्चेकंपनीपासून ते आजीआजोबांपर्यंत सर्वांसाठी विविध प्रकारच्या सुविधाही तेथे निर्माण केल्या. पण केवळ सत्ताधाऱ्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून उद्यान बंदच होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आज शिवसेनेने जनआंदोलन उभारून बंद असलेल्या उद्यानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले.

खेळणी तुटलेली, झाडांची दुर्दशा, परिसर अस्वच्छ अशी उद्यानाची परिस्थिती निर्माण झाली होती. आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उद्यानाचे नूतनीकरण केले. उद्यान आता पूर्णतः सुसज्ज झाले असतानाही सत्ताधारी नेत्यांना उद्घाटनाला वेळ नसल्यामुळे ते बंदच ठेवण्यात येत होते. ही बाब स्थानिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

अखेर कुलूप तोडले शिवसैनिक, राष्ट्रीय कल्याण
पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. संतप्त नागरिक व शिवसैनिकांनी उद्यानाचे कुलूप तोडून ते सर्वांसाठी खुले केले. या आंदोलनात शहर संघटक मीना माळवे, युवासेनेचे नीरज कुमार, देवेंद्र प्रसाद, प्रकाश जाधव, अमित ऊगले, शशीकांत गायकर, अशोक पंडागळे, वेद प्रकाश घरत, दत्ताराम नार्वेकर, भरत गायकर, हेमंत चौधरी, आत्माराम डिंगे, अमोल पवार, शैलेश तिवारी, राहुल काटकर सहभागी झाले होते. उद्यान परिसरात अनैतिक प्रकार वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने सुरक्षा वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. अशी मागणी शहरप्रमुख शरद पाटील यांनी केली आहे.