थंडीचा हंगाम सुरु झाला; कोकणच्या समुद्रकिनारी स्थलांतरीत पक्षांची लगबग

थंडीचा हंगाम सुरु झाला की, कोकणात विविध परदेशी पक्षांचे आगमन होते. प्रथम आगमन होते ते पांढऱ्यासह विविध रंगांच्या बगळ्यांचे. हे बगळे दरवर्षी आपला मुक्काम ठराविक ठिकाणीच करतात, हे एका पाहणीत आढळून आले आहे. बगळ्यांच्या पाठोपाठ थव्याने आगमन होते ते सीगल पक्षांचे. सीगल हे रायगड आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीवर येतात आणि स्थिरावतात. मात्र, बगळे आपला मुक्काम नदी किनाऱ्यांच्या आसपासच करतात. सध्या कोकणातील विविध किनारे सीगल पक्षांच्या आगमनांनी फुलले असून बगळ्यांच्या वास्तव्याने नदी किनाऱ्यांवरील वृक्ष फुलून गेले आहेत. असे असले तरी, फ्लेमिंगो हे पक्षी मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांवर येत नाहीत.

कोकणात येणाऱ्या स्थलांतरीत बगळ्यांच्या चार ते पाच जाती आहेत. हे बगळे दिवसभर आपले भक्ष मिळविण्यासाठी आजूबाजूच्या नदी किनाऱ्यांवर जातात आणि सायंकाळी त्याच मार्गाने परतून आपल्या ठरलेल्या मुक्कामी परततात. बगळ्यांचे थवे हे दहा ते पंधराच्या संख्येने वावरतात. सायंकाळी सुर्यास्त झाल्यानंतर रोज ज्या वृक्षावर वास्तव्याला असतात तेथेच न चुकता मुक्काम करतात. हे स्थलांतरीत बगळे आपल्या मुक्कामाच्या आसपास अन्य कोणत्याही पक्षांना येवू देत नाहीत.

दापोली, गुहागर आणि रत्नागिरी परिसरातील विविध समुद्र किनाऱ्यांवर शेकडोंच्या संख्येने सीगल पक्षी आल्याचे दिसत असून पर्यटकांसाठी देखील ही एक पर्वणीच ठरत आहे. राजापूर – तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर देखील हे सीगल पक्षी अवतरले असून या पाहुण्यांनी किनारपट्टीवर मुक्काम ठोकला आहे. लडाख प्रदेशामध्ये आढळणारा सीगल पक्षी येथील किनारपट्टीवर आला आहे. लालभडक चोच, पांढऱ्या शुभ्र पिसांनी वेढलेले शरीर अशा आकर्षक असलेल्या या सिगल पक्ष्याच्या थव्यांनी तालुक्याची पश्चिम किनारपट्टी फुलून गेली आहे.

लडाख प्रदेशामध्ये आढळणारा सीगल थंडीच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या किनारपट्टीवर येतो. थंडीच्या कालावधीमध्ये लडाखमध्ये मोठ्याप्रमाणात पडणाऱ्या बर्फामुळे या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. त्यामुळे खाद्य आणि वास्तव्याला अनुकूल असलेल्या परिसरात सिगल काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात. तालुक्यातील वेत्ये, आंबोळगड, नाटे आदी परिसरामध्ये हे पक्षी मोठ्या संख्येने आले आहेत. या पक्षाच्या हवेतील सहजसुंदर कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनाऱ्यावर वळू लागली आहेत.

लालभडक चोच, पांढरे शुभ्र पिसांचे आकर्षक आणि देखणे शरीर असलेल्या सीगल पक्षाच्या जगामध्ये सुमारे ९ हजार प्रजाती आहेत. त्यापैकी सुमारे १२२५ प्रजाती हिंदुस्थानात आढळतात. थंडीच्या कालावधीमध्ये मुबलक खाद्य आणि समागम करण्यासाठी अनुकूल असलेल्या प्रदेशामध्ये हे पक्षी स्थलांतरीत होतात. समागमानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अंडी घालण्यासाठी पुन्हा मायदेशी परतात. स्थलांतरित होणारे पक्षी सुमारे पंधरा हजार किमीचे अंतर साधारणपणे तीन महिन्यात ताशी २० ते २५ किमीच्या वेगाने कापतात.

दापोली, रत्नागिरीसह राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर सिगल पक्ष्याचे आगमन झाले आहे. थंडीची चाहूल लागताच सिगल पक्षी या किनाऱ्यावर येतात. सकाळी सात ते बारावाजेपर्यंत किनारी असतात. वाळू तापली की समुद्रात पाण्यावर बसतात. दुपारी तीन वाजता परत किनारी येतात. सूर्यास्तानंतर पुन्हा समुद्रात पाण्यात जातात,असे दृष्य पाहायला मिळत आहे.