सूर्या, शुभमनकडे नजर आहे!

नव्या चंदिगडमध्ये आज होणाऱ्या सामन्यात दवाची कहाणी बदलणार की नव्या कथानकाचा जन्म होणार! पहिल्या सामन्यात तर अर्शदीपने पहिल्याच षटकात ही कहाणी अळवावरचीच ठरवली होती! आजही ती तशीच ठरण्याची शक्यता अधिक आहे.

मुल्लनपूरच्या या स्टेडियमची खेळपट्टी धावांची उधळपट्टी करते असं म्हणतात. त्यामुळे अभिषेक, उपकप्तान शुभमन आणि कप्तान सूर्यकुमार फलंदाजी करण्यासाठी आसुसलेले असतील.

आपल्या विजयी संघात काही बदल होतील असं वाटत नाही. मात्र अभिषेक, शुभमन आणि सूर्याने त्यांच्या शैलीत थोडे फेरफार करणं संयुक्तिक ठरेल. प्रतिस्पर्धी गोलंदाज तुमची खेळण्याची पद्धत वेळोवेळी अभ्यासत असतात. अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तसा धडा न गिरवण्याचं काहीच कारण नाही. अशा परिस्थितीत अभिषेक जर प्रत्येक वेळी किंचित स्टंप सोडून सरसावणार असेल, शुभमन चेंडूचा कमी अधिक झालेला वेग ध्यानात घेणार नसेल आणि सूर्या अनावश्यक आक्रमकतेला लगाम लावणार नसेल तर त्यांच्यासाठी धावा मृगजळासारख्याच राहतील! टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये असे तीन नाकर्ते फलंदाज संघात असणं आपल्याला परवडण्यासारखं नक्कीच नाही. आतापर्यंत सातत्याने अपयशी ठरलेल्या किमान शुभमन आणि सूर्याला ठिकाणावर आणण्याची गंभीरची जबाबदारी आहे. मुळात, गिलने सलामीला न जाता तिसऱया किंवा चौथ्या क्रमांकावर खेळावं असं माझं मत आहे! त्यामुळे संजू आघाडीला खेळू शकेल. त्याला सलामीला पाठवा, अन्यथा हरिद्वारला, अशी टोमणेवजा टिप्पणी मी केली होती. कदाचित इंडिगोच्या झालेल्या फजितीमुळे हरिद्वारचं तिकीट मिळालं नसावं अन् म्हणूनच संजू अजून संघात दिसत असेल! सूर्या-शुभमनच्या कामगिरीकडे मात्र लक्ष राहीलच!

गंपू गंभीरने आणखी एक गोष्ट गाठीला मारणं जरूरी आहे. शिवम दुबे आशियाई स्पर्धेत पाकविरुद्ध महत्त्वाचा ठरला होता. आज आफ्रिकेविरुद्धही तो चालून जाईल. पण विश्वचषकात त्याच्याऐवजी नियमित गोलंदाज, त्यातही कुलदीप संघात असेल तर जास्त परिणामकारक ठरेल. शिवमची आठव्या क्रमांकाची फलंदाजी अन् चार षटकं यापेक्षा एक प्रस्थापित फलंदाज किंवा गोलंदाज हाच शहाणपणा!

यष्टिरक्षकाचा प्रश्न जितेश शर्माच्या नावाने आपण सोडवलेला आहे का, हेसुद्धा स्पष्ट नाहीये. सर्वात आधी त्याला कुठल्या कामगिरीमुळे संघात जागा मिळाली हेच ज्ञात नाही. उभरत्या खेळाडूंसाठीच्या आशिया कप स्पर्धेत तो कप्तान होता एवढंच. अंतिम सामन्यात त्याने उचललेली पावलं टीकेचा उंबरठा ओलांडून गेली होती! ऋषभ पंत गेल्या काही काळात टी–ट्वेंटी मालिकांत खेळलेला नाही. म्हणजे आपण त्याचा अनुभव आणि धडाका नाकारून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे का! जितेशने पहिल्या सामन्यात चार झेल घेतले. पण बत्तीस वर्षांच्या अन् दहा -बारा सामने खेळलेल्या जितेशवर एवढा विश्वास!

दाजीबा, कुठं तरी पाणी मुरतंय, नाही म्हणू नका…