महाबळेश्वरच्या निवडणुकीला ग्रीन सिग्नल; आक्षेपांवर तीन आठवड्यानंतर सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवत आक्षेपार्ह उमेदवारांविरोधात दाखल झालेल्या अर्जांची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी सुनावला. सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी पात्र ठरवून निवडणुकीला हिरवा कंदील दाखवल्याने निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजले आहे.

राज्यातील सुमारे 26 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारांविरोधात दाखल झालेल्या विविध तक्रारींमुळे निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. सर्व प्रकरणे एकत्र करून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आली. न्यायालयाने या सर्व अर्जांचा अभ्यास करून एकत्रित सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलली असली, तरी निवडणूक मात्र निर्धारित तारखांना घेण्याचे स्पष्ट केले आहे.

महाबळेश्वर नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार डी. एम. बावळेकर (लोकमित्र जनसेवा आघाडी) आणि सुनील शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्याविरोधात थकबाकीबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच प्रभाग क्रमांक सहामधील शिवसेना पुरस्कृत उमेदवार राहुल भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष शिंदे यांच्याविरोधात तीन अपत्यांचा मुद्दा उपस्थित करत अर्ज दाखल केला होता.

तपासणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन म्हस्के यांनी सर्व तक्रारी फेटाळल्या. त्यानंतर दाखल झालेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकादेखील फेटाळल्या गेल्याने संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच तक्रारींमुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने तक्रार दाखल असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बावीस दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परिणामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांच्या मतपेटय़ा राखीव ठेवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा वाढीव खर्चदेखील आयोगावर पडला होता. आज सकाळी उच्च न्यायालयात आलेल्या प्रकरणात न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी उमेदवारांविरोधातील सर्व तक्रारी निकाली काढत निवडणुकीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव पुन्हा बहरला असून, दि. 20 रोजी मतदान आणि 21 रोजी एकत्रित निकाल जाहीर होण्याचा मार्ग खुला झाला आहे.