
>>डॉ. समिरा गुजर-जोशी
प्राव्रृषेण्यस्य मालिन्यं दोष को?भीष्टवर्षिण । शारदाभ्रस्य शुभ्रत्वं वद कुत्रोपयुज्यते।।
पावसाळी मेघ हे काळे असतात, मलिन असतात, पण ते पाणी देतात. शरद ऋतूतील मेघ पांढरे शुभ्र दिसतात खरे, पण त्या शुभ्र रंगाचा काय उपयोग?
बाह्य सौंदर्यापेक्षा माणसाची योग्यता ही त्याच्या गुणांवरूनच करायला हवी. आजही आपल्याकडे गोऱया रंगाचे एक विचित्र आकर्षण आहे. एखादी व्यक्ती दिसायला आकर्षक असली की ती गुणवान असली पाहिजे असे कुठेतरी गृहीतच धरले जाते. कधी कधी एखादी खरोखर गुणवान असणारी व्यक्ती ही केवळ दिसण्यात उजवी नाही म्हणून तिला महत्त्व दिले जात नाही. तिची हवी तशी दखल घेतली जात नाही. याविषयी निसर्गातील एक बोलके उदाहरण देऊन या श्लोकात भाष्य करण्यात आले आहे. शरद ऋतूतील मेघांविषयी `गर्जेल तो वर्षेल काय?’ अशीही म्हण प्रसिद्ध आहे.






























































