भलीमोठी क्रेन चौथ्या मजल्यावरील घरात घुसली, हादरा बसल्याने रहिवाशांमध्ये घबराट

crane crash prabhadevi building

प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरासमोर आज एक धक्कादायक घटना घडली. बांधकामाच्या ठिकाणी असलेली एका भलीमोठी क्रेन त्याच ठिकाणी असलेल्या एका सात मजली इमारतीवर आदळली. चौथ्या मजल्यावरील एका घरातच क्रेन घुसल्याने मोठा हाहाकार उडाला. क्रेन आदळल्याचा हादरा इतका जोरदार होता की, इमारतीमधील राहिवाशांमध्ये घबराट उडाली. सुदैवाने यात कोणालाही दुखापतदेखील झाली नाही.

रवींद्र नाटय़ मंदिरासमोर क्रिप्टॉन कंपनीद्वारे पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्याच ठिकाणी उद्यान दर्शन नावाची सात मजली इमारत आहे. आज बांधकामाच्या ठिकाणी क्रेनद्वारे काम सुरू असताना संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ती क्रेन चौथ्या मजल्यावर एका घरावर आदळली. हा हादरा इतका जोरदार होता की, भूकंप आला की काय अशी भीती रहिवाशांना वाटली. त्यामुळे इमारतीमधील रहिवासी जीव मुठीत धरून सैरावैरा पळत सुटले. अखेर भलीमोठी क्रेन इमारतीवर आदळल्याचे व त्यात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुदैवाने क्रेन ज्या घरावर आदळली त्यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी दादर पोलिसांत तक्रार देण्यात आली असून त्यानुसार पोलीस या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहेत.

संध्याकाळी उशिरापर्यंत क्रेन तेथून हटविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला. क्रेन आदळल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. पण कोणाच्या जिवावर बेतले असते तर, असा प्रश्न उपस्थित करत रहिवाशांनी अशा प्रकारे बेजबाबदारपणे काम करणाऱयांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेमुळे इमारतीचे नुकसान झाले असून त्याची भरपाई करून देण्याची मागणीदेखील त्यांची आहे.