
सोसायटीच्या जागेच्या वादातून एका तरुणाची सामूहिक मारहाणीत हत्या करून गेल्या दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या दोघा आरोपींना वडाळा टी.टी. पोलिसांनी अखेर बेडय़ा ठोकल्या. दोघांनाही चेन्नई येथे पकडण्यात आले.
सप्टेंबर 2024 रोजी विजय नगरात राहणाऱ्या जावेद चौधरी यास अल्मेडा पंपाउंड येथील सोसायटीच्या जागेवरून 10 ते 15 आरोपींनी केबल वाटर, स्टंप, बॅटने बेदम मारहाण केली होती. त्या मारहाणीत जावेदचा मृत्यू झाला होता. तेव्हा वडाळा टी.टी. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून चौघा आरोपींना पकडले होते. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान, या गुह्यातील दोन आरोपी भरत ऊर्फ राहुल रमेश सोलंकी आणि विल्यम लियो जोसेफ हे गुन्हा घडल्यापासून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेशांतर करून वास्तव्य करत होते आणि आता ते चेन्नई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक मनिष आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नवले तसेच मीर, शिंदे, भोसले या पथकाने चेन्नईत जाऊन दोघांना पकडून आणले.





























































