फुटबॉलच्या सम्राटाला जीवनगौरव, थियरी हेन्रीला बीबीसी ‘स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर’चा पुरस्कार

आर्सेनल आणि फ्रान्सचा माजी दिग्गज स्ट्रायकर थियरी हेन्रीला 2025 च्या बीबीसी ‘स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 2014 मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्त झालेल्या हेन्रीने हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली.

‘फुटबॉलने मला सर्व काही दिले आहे आणि मीही माझे सर्वस्व त्याला दिले आहे. या लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारामुळे फुटबॉलच्या इतिहासाचा भाग म्हणून माझी दखल घेतली जात आहे. चाहत्यांसाठी आणि माझ्या संघसहकाऱयांसाठी ओळख निर्माण करणे ही गोष्ट मी कधीही गृहीत धरणार नाही,’ असे हेन्रीने सांगितले.

आर्सेनलसाठी दोन टप्प्यांत खेळताना हेन्रीने 377 सामन्यांत 228 गोल नोंदवत 2005 मध्ये इयान राईटला मागे टाकून क्लबचा सर्वकालीन सर्वोच्च गोल करणारा फुटबॉलपटू होण्याचा मान मिळवला. ‘गनर्स’सोबत हेन्रीने दोन प्रीमियर लीग आणि तीन एफए कप जिंकले. यातील सर्वात ऐतिहासिक कामगिरी 2003-04 हंगामातील अजेय मोहीम ठरली.
हेन्रीने चार वेळा प्रीमियर लीग गोल्डन बूट पटकावला असून सलग सहा हंगाम ‘पीएफए टीम ऑफ द इयर’मध्ये स्थान मिळवले. फुटबॉलच्या इतिहासावर अमीट ठसा उमटवणाऱया या कारकीर्दीचा गौरव आता जीवनगौरव पुरस्काराने केला जाणार आहे.