
पाकिस्तानी नागरिक हे धोकादायक ठरत असून भीक मागण्याच्या धंद्यात त्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यासोबतच गुन्हेगारीतही त्यांची संख्या जास्त आहे. संघटित भिकेचा धंदा आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांनी पाकिस्तानी नागरिकांवरील पाळत कडक केली आहे. सौदी अरेबियाने या वर्षात तब्बल २४,००० पाकिस्तानी नागरिकांना भिक मागण्याच्या आरोपाखाली देशाबाहेर काढले (डिपोर्ट) आहे. या प्रकारामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जात असल्याची कबुली स्वतः पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यूएईकडून व्हिसा निर्बंध
केवळ सौदीच नव्हे, तर यूएईनेही बहुतांश पाकिस्तानी नागरिकांवर व्हिसा निर्बंध लादले आहेत. यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर काही पाकिस्तानी नागरिक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होत असल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आकडेवारी काय सांगते?
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (FIA) माहितीनुसार, २०२५ मध्ये विमानतळांवर ६६,१५४ प्रवाशांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. भिकेचा धंदा चालवणाऱ्या टोळ्या मोडीत काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. केवळ आखाती देशांतच नव्हे, तर आफ्रिका, युरोप, कंबोडिया आणि थायलंड सारख्या देशांमध्येही पर्यटक व्हिसाचा गैरवापर करून पाकिस्तानी नागरिक भिक मागत असल्याचे समोर आले आहे.
सौदी अरेबिया: २४,००० पाकिस्तानी नागरिकांना भिकेच्या आरोपाखाली मायदेशी पाठवले.
दुबई: जवळपास ६,००० जणांना परत पाठवले.
अझरबैजान: सुमारे २,५०० पाकिस्तानी भिकाऱ्यांना बाहेर काढले.
गेल्या वर्षी सौदी अरेबियाने पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. उमराह व्हिसाचा वापर करून पवित्र मक्का आणि मदिना येथे भिक मागण्याचे प्रकार थांबवावे, अन्यथा हज आणि उमराह यात्रेकरूंवर याचे गंभीर परिणाम होतील, असे सौदीच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने म्हटले होते.
हा गरिबीचा नव्हे, तर व्यवसायाचा भाग! पाकिस्तानी कायदेतज्ज्ञाचे मत
पाकिस्तानातील कायदेतज्ज्ञ राफिया झकारिया यांच्या मते, ही केवळ हतबलता नसून एक संघटित उद्योग आहे. पाकिस्तानातील या ‘भिक उद्योगाने’ आता आपला व्यवसाय परदेशात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे इतर देशांत जाणाऱ्या प्रामाणिक पाकिस्तानी प्रवाशांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.



























































